Suruchi Adarkar Piyush Ranade Marriage : सर्वत्र सध्या लग्नाचे वारे वाहताना पाहायला मिळाले. अशातच मनोरंजनविश्वात सुद्धा अनेक जोडपी विवाह बंधनात अडकली. प्रथमेश-मुग्धा, स्वानंदी-आशिष, गौतमी-स्वानंद या जोडींनी लग्नगाठ बांधली. याशिवाय आणखी एक कलाकार जोडी त्यांच्या शाही लग्नसोहळ्याने चर्चेत आली. ती जोडी म्हणजे अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे. कोणताही गाजावाजा न करता, कोणालाही बारीकशी हिंट लागू न देता या जोडीने लग्न केलं.
लग्नानंतर सुरुचीचं आयुष्य कसं बदललं आहे याबाबत अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. लग्नानंतर सुरुची छोट्या पडद्यावर परतली आहे. सुरुची अडारकरने ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून सिनेविश्वात कमबॅक केलं आहे. या मालिकेत तिची नागीणची भूमिका असलेली पाहायला मिळत आहे. या भूमिकेबद्दल ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सुरुची म्हणाली, “माझा लूक मी याआधी साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळा आहे. मी अशी भूमिका कधीच साकारली नाही” असं ती म्हणाली.
लग्नानंतर आयुष्यात आलेल्या बदलांबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली, “लग्नानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. पूर्वी मी माझे शूट संपवून घरी जायचे तेव्हा आई सर्व गोष्टींची काळजी घ्यायची. आता ती जबाबदारी माझी मला सांभाळावी लागत आहे. माझा नवरा पियुष माझा खूप मोठा आधार आहे. आम्ही घरातील कामं वाटून घेतो. मी घरातील सामान आणते आणि इतर कामं बघते. बाकीची कामं पियुष बघतो. मी सध्या माझ्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. हा आयुष्यातील सर्वात चांगल्या टप्प्यांपैकी एक आहे. मला ही मालिका लगेच मिळाली, हा मी एक आशीर्वाद समजते” असंही ती म्हणाली.
लग्नाबाबत भाष्य करताना ती म्हणाली, “मी प्रचंड आनंदी आहे. या क्षणाला मी माझ्या भावना शब्दांत व्यक्त करु शकत नाही. मला हे सगळंच स्वप्नवत वाटतं आहे. खरं सांगायचं झालं, तर माझ्या मनात एक वेगळीच जादुई भावना निर्माण झाली. पियुष माणूस म्हणून खूपच चांगला व्यक्ती आहे. अतिशय भावनिक, काळजी घेणारा आहे. मी खरंच भाग्यवान आहे म्हणून मला पियुषसारखा जोडीदार लाभला” असंही ती म्हणाली.