बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिची बहुचर्चित वेबसीरिज ‘ताली’ काल ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या वेबसीरिजमध्ये सुश्मिता सेनने मुख्य भूमिका साकारली आहे. या वेबसीरिजमधून गौरी सावंत यांचं आयुष्य मांडणं हे अत्यंत आव्हानात्मक होतं, पण सर्व कलाकार व तंत्रज्ञ यांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतल्यामुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आपल्या आयुष्यावर आधारित ही बायोपिक पाहताना सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत भारावून गेल्या आहेत. (taali web series)
गौरी सावंत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत ‘ताली’ वेबसीरिजचे आणि सुश्मिताच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. शिवाय त्यांनी या वेबसीरिजच्या लेखक, दिग्दर्शक व इतर कलाकारांचे आभार मानले आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत या पोस्टमध्ये म्हणाल्या, “आपलीच ‘टाळी’ जेव्हा जोरात वाजते, तेव्हा कधी कधी आपणच दचकतो, जसं आपली जीभ आपल्या दाताखाली येते तेव्हा. आज बायोपिक बघताना हेच होतं माझ्या मनात, ठिबक सिंचन डोळ्यातून चालूच होते. तृतीयपंथीयांच्या पालकांना काय वाटत असेल….. होणारी घुसमट, त्रास याला न्याय दिला आहे सुश्मिताने… क्षितिज काय लिहिलंय रे बाबा… रवी जाधव यांनी खूप छान दिग्दर्शन केले आहे. माझ्या संपूर्ण समाजाकडून मी तुमचे आभार मानते… सरळ सोप्या पद्धतीने माझे आयुष्य दाखवल्याबद्दल… अफिफा नडीयादवाला हिने मला नव्याने जगासमोर आणलं.. कार्तिक आणि अर्जुन यांचेही आभार.” त्यांच्या या पोस्टवर लेखक क्षितिज पटवर्धन यांनी “ही आमच्यासाठी सगळ्यात मोठी पावती आहे” अशी कमेंट केली आहे.
हे देखील वाचा – “बायका मला ढकलून…”, मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करण्याची जुई गडकरीला भीती, म्हणाली, “आता मला…”
रवी जाधव दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये सुश्मिता सेनसह सुव्रत जोशी, कृतिका देव, हेमांगी कवी, ऐश्वर्या नारकर, विक्रम भाम आदी प्रमुख भूमिकेत आहे. तर लेखन क्षितिज पटवर्धन यांनी केले आहे. (taali web series)