श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आल्याने सर्वत्र काळजीचं वातावरण पाहायला मिळालं. श्रेयस ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता. चित्रीकरण संपवून तो घरी आला असताना ही घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे. शुटिंगवरून घरी येत असताना अभिनेत्याला अस्वस्थ वाटू लागल्याचं त्याने पत्नीला सांगितलं. त्यानंतर श्रेयसला अंधेरीमधील बेलव्हू रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. (Shreyas Talpade Health Update)
अभिनेत्याच्या पत्नीने श्रेयस बरा असल्याची पोस्ट चाहत्यांसह शेअर केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा दीप्ती तळपदेने केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिप्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून श्रेयस घरी परतला असल्याची पोस्ट शेअर केली आहे. सदर पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांचे, देवाचे, हॉस्पिटलमधील कर्मचारी, डॉक्टर यांचे आभार मानले आहेत.
दिप्तीने श्रेयसबरोबरचे फोटो शेअर करत, “माझा श्रेयस घरी परतला आहे. आणि तो सुरक्षित आहे. मी श्रेयसशी वाद घालत असते की, विश्वास कशावर ठेवावा हे मला माहित नाही. आज मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. ते म्हणजे दैवी शक्ती. आमच्या आयुष्यात ही भयानक घटना घडली त्या संध्याकाळी तो माझ्याबरोबर होता. यापुढे त्याच्या अस्तित्वावर कधी मी प्रश्नचिन्ह निर्माण करेन असे मला वाटत नाही”.
पुढचा फोटो शेअर करत तिने त्यावर कॅप्शन देत लिहिलं आहे की, “मी थोडा वेळ काढून आभार मानू इच्छिते. माझ्या संकटाच्या वेळी मी इतरांकडे मदतीसाठी हाक मारली. श्रेयस गाडीमध्ये पडून असताना, मदत करणाऱ्या व्यक्ती कोणाला मदत करत आहेत याची कोणालाच कल्पना नव्हती. तरीही त्यांनी धावत येत मला मदतीचा हात दिला. मला आशा आहे की, माझा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचेल. मी कायम तुमच्या या मदतीची ऋणी राहीन”.
यापुढे श्रेयसच्या पत्नीने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “मुंबईसारख्या या महान शहरात घेतली गेलेली काळजी वाखाण्याजोगी आहे. मी मित्रपरिवार, आमचे कुटुंब, आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीने दिलेल्या प्रेम व काळजीबद्दल आभार मानू इच्छिते. यावेळी सगळेचजण माझ्या पाठीशी उभे होते. तुम्हा सर्वांमुळे मी एकटी नव्हती. मी बेलव्हू रुग्णालयाच्या उत्कृष्ट टीमचे आभार मानू इच्छिते. ज्यांनी माझ्या पतीला वाचवले. सर्व डॉक्टर, भगिनी, बंधू, मुले, मावशी, मामा, प्रशासन व सुरक्षा यांच्या प्रत्येक कृत्यासाठी कोणतेही आभार पुरेसे नाहीत. मी सर्व चाहत्यांचे आभार मानते. ज्यांनी श्रेयसच्या सुरक्षिततेसाठी व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. तुमचे प्रेम, प्रार्थना व आशीर्वाद आमच्यासह सदैव राहूदे. तसेच देवाचीही मी सदैव कृतज्ञ राहीन. धन्यवाद”.