मालिकाविश्वात वेगळं कथानक घेऊन नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. यांत काही मालिका ठराविक काळातच प्रेक्षकांची मन जिंकतात. या मालिकांमधील पात्र ही प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. अशीच नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मालिका म्हणजे ‘तू चाल पुढं’. झी मराठी वाहिनीवरील ही मालिका कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेच्या प्रमुख व्यक्तीरेखेत दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर आगमन करणारी अभिनेत्री म्हणजे दीपा चौधरी. दीपा चौधरी हिने ही या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. अशातच या मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने मालिकेचा निरोप घेतला असल्याचं समोर आलं आहे. (Tu Chal Pudha Actress)
मालिकेच्या कथेमध्ये वेळोवेळी येणाऱ्या वळणांमुळे मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता. अशातच मालिकेतील अभिनेत्री स्नेहा माजगावकर हीने मालिका सोडली असल्याचं कळतं आहे. याबाबत स्नेहाने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत मालिका सोडली असल्याचं सांगितलं.
मालिकेत स्नेहाने अश्निनीच्या खास मैत्रिणीची भूमिका साकारली होती. स्नेहाने या मालिकेत प्राजक्ता ही भूमिका साकारली होती, तर अश्विनीच्या भूमिकेत दीपाला पाहायला मिळालं. ऑनस्क्रीन त्यांची असलेली मैत्री प्रेक्षकांना खुप आवडली.
स्नेहाने तीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मालिकेतील पडद्यामागील धमाल-मस्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने मालिकेतील सगळ्या पात्रांसोबत घालवलेल्या क्षणांचा एकत्रित व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत ती म्हणाली, “मालिका संपत नाहीये मी या पुढे मालिकेत नसेन”. स्नेहाने मालिका का सोडली याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. आता मालिकेत प्राजक्ताची भूमिका कोण साकारणार? याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.