अफलातून विनोद शैलीसाठी ओळखला जाणारा कलाकार म्हणजे राजपाल यादव. आजपर्यंत राजपालने विविध हिंदी चित्रपटात काम केलं आहे. कॉमेडी कलाकार म्हणून त्याचा वेगळा असा चाहतावर्ग आहे. त्याने साकरलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. ‘भुल भुलैय्या’ चित्रपटातील अक्षय कुमारबरोबरची त्याने साकारलेली पंडित ही भूमिका भलतीच गाजली. सध्या राजपाल अशाच एका नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्याचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Rajpal Yadav Dance Video Viral)
राजपाल त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सांगलीमध्ये आहे. शुटिंग दरम्यान राजपाल सांगलीतील वातावरणात भारावून गेला. या सगळ्यात राजपालचं सांगली शहराशी वेगळंच नातं असल्याचं पाहायला मिळालं. चित्रीकरणा दरम्यान राजपालचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात तो ढोल-ताशांवर बेभान होऊन नाचताना दिसत आहे. त्याचा हा उत्साह पाहता आजूबाजूची मंडळीही त्याचा हा उत्साह एण्जॉय करताना दिसत आहेत.
पाहा – कसा केला राजपालने बेभान नाच (Rajpal Yadav Dance Video Viral)
मराठमोळ्या अंदाजात राजपालने ठेका धरला आहे. यात महिलांचं ढोल-ताशा पथकही सहभागी झालेलं आहे. त्याचा हा डान्स पाहून नक्कीच अनेकजणांना गणपती मिरवणूकीची आठवण झाली असावी. यावेळी राजपालने पांढरा कुर्ता व जीन्स पँट परिधान केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडूनही त्याला भरभरून प्रेम मिळत आहे.
‘काम चालु है’ चित्रपटाचं चित्रीकरण तो सध्या करत आहे. या चित्रपटातील त्याचा पहिला लूक व्हायरल झाला आहे. या पोस्टरमध्ये राजपालच्या पाठीमागे सांगली नाव असलेला बोर्ड दिसत आहे. या पोस्टरने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पलक मुच्छलचा भाऊ पलश मुच्छलने केलं आहे.