अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अभिनयासह सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कांत असतो. तो नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कांत राहत असतो. सध्या संकर्षण नाटकविश्वाकडे वळला आहे. अशातच हल्लीच एका नाटकाने निरोप घेताच संकर्षणने याबाबत शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाला व या नाटकामुळे शरद पोंक्षे यांना एक वेगळीच ओळख मिळाली. या नाटकामुळे लोकप्रिय झालेले शरद पोंक्षे कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिले. आता मात्र या नाटकाने राम राम केला आहे. (Sankarshan Karhade On Sharad Ponkshe)
शरद पोंक्षे यांनी धाडसी निर्णय घेत ‘नथुराम गोडसे’ या नाटकाला पूर्णविराम दिला आहे. त्यांची ही कृती पाहता संकर्षणने त्यांच्या कौतुकास्पद बनवलेला व्हिडीओ शरद पोंक्षे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केला आहे. “संकर्षण किती सुंदर प्रतिक्रिया दिलीस मित्रा धन्यवाद”, असं कॅप्शन देत शरद पोंक्षे यांनी संकर्षणचा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओत संकर्षण म्हणतोय, “नमस्कार मी संकर्षण कऱ्हाडे. मी ‘नथुराम गोडसे’ या नाटकाच्या संपूर्ण टीमसाठी हा व्हिडीओ करतोय. तुम्ही आज हे नाटक आणि कलाकृती पूर्ण करताय. थांबताय, संपवताय असं चुकूनही म्हणणार नाही. तुम्ही कलाकृती पूर्ण करताय. याच्यानंतर आपल्या या कलाकृतीचा प्रयोग बघायला मिळणार नाही. हे फार धाडसाचं काम आहे. लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत असताना सुद्धा एखादी कलाकृती पूर्ण करणं, तिला पूर्णविराम देणं, हे धाडसाचं जास्त काम आहे. ऐरवी शुभारंभाच्या प्रयोगाच्या शुभेच्छा देतो तेही महत्त्वाचं आहे. ऐकवेळ शुभारंभाचा प्रयोग तुलनेने सोपा पण उदंड प्रतिसादाच्या महासागरात प्रयोग पूर्ण करणं, तो परत न करणं हे जास्त अवघड आहे”.
पुढे तो म्हणाला आहे की, “या चिकाटी आणि धाडसाबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार, तुमच्या टीमला सलाम. तुमच्यातल्या काही लोकांना मी वैयक्तिक ओळखतो राजेश कांबळे सर आहे, घाटे सर आहेत, पोंक्षे सर अर्थात आहेतच पण तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. ही कलाकृती आता इथे पूर्ण होतं असली तरी वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून आम्हाला भेटत राहा. या संपूर्ण टीमला मनापासून नमस्कार आणि अनंत शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी, धन्यवाद.”