प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान त्यांच्या सुमधुर आवाजाने रसिक श्रोत्यांना कायमच मंत्रमुग्ध करत असतात. आपल्या आवाजाने व गायकीने नेहमीच चर्चेत असणारे हे गायक त्यांच्या नुकत्याच एका कृतीने चर्चेत आले आहेत. गायक राहत फतेह अली खान यांच्याबाबत नुकतीच एक थक्क करणारी बातमी समोर येत आहे. राहत यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून राहत हे नोकराला चपलेने मारहाण करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राहत आपल्या घरातील काम करणाऱ्या नोकराला चपलेने मारताना अन् खेचताना दिसत आहेत. ते त्या व्यक्तीच्या डोक्यावर चपलेने मारत टेबलावर ठेवलेली दारूची बाटली गेली कुठे, अशी विचारणाही करत आहेत. राहत फतेह अली खान यांनी प्रश्न विचारल्यावर नोकर शांत राहातो. तो काहीही बोलत नाही. मग राहत पुन्हा त्याच्या जवळ जातात. पुन्हा त्याचे केस पकडतात आणि त्याला मारतात. मारता- मारता खाली पडतात. यावेळी आजूबाजूचे लोक त्यांनी उठवतात. पण तरिही राहत त्या नोकराला मारणं सोडत नाहीत. ते पुन्हा नोकराला मारू लागतात.
Famous singer Rahat Fateh Ali khan beating his servent for bottle of Alcohol pic.twitter.com/9DZwYxgPmV
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) January 27, 2024
राहत यांचा नोकराला मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी राहत यांच्यावर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी राहत यांच्या गाण्यावर बहिष्कार टाकण्याची मागणीदेखील केली आहे. राहत यांनी दारूच्या एका बाटलीसाठी केलेलं हे कृत्य अतिशय अमानवी व अमानुष असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.
Update : Rahat Fateh Ali Khan ( @RFAKWorld )issued a clarification regarding his viral video, There was holy water in the bottle pic.twitter.com/oIStHwWXFp
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) January 27, 2024
दरम्यान, राहत यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरताच राहत यांनी त्याच नोकराबरोबर आणखी एक व्हिडीओ बनवून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राहत यांनी त्याची माफी मागितली असून तो त्यांचा शिष्य असल्याचंही स्पष्ट केलं. गुरु-शिष्यात असंच नातं असतं. चांगलं काम केलं तर शाबासकी आणि चूक झाली तर ओरडा मिळणारच असं राहत यांनी त्या व्हिडीओमध्ये सांगताना स्पष्ट केलं आहे.
आणखी वाचा – मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य होताच ‘या’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद, म्हणाली…
तसेच या व्हिडीओमधून नोकराने दारूच्या बाटलीमुळे नव्हे तर पवित्र पाण्याच्या एका बाटलीवरुन वाद उद्भवला असल्याचं कबूल केलं आहे. राहत हे त्यांच्या शिष्यांवर प्रचंड प्रेम करतात, त्यांना उगाच बदनाम करण्यासाठी या गोष्टी पसरवल्या जात असल्याचंही त्याने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.