बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने त्याने विविध मुलाखतीही दिल्या. यावेळी त्याने त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटबाबत खुलेपणाने भाष्य केलं. इतकंच काय तर एका कार्यक्रमात तो गौरीला घेऊन आला. आमिरने वयाच्या ६०व्या वर्षी प्रेमात पडलो असल्याची कबुली दिली. सगळ्यांना गर्लफ्रेंड गौरीची ओळखही करुन दिली. त्याच्या संपूर्ण कुटुंबियांनाही आमिर-गौरीचं नातं मान्य आहे. अशातच आता सलमान खाननेही आमिरच्या नात्यावर मिश्कीलपणे भाष्य केलं आहे. (Salman Khan on Aamir Khan Dating new Girlfriend)
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. या शोचा पहिला भाग २१ जूनला नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल. दरम्यान शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये सलमान खान हजेरी लावणार आहे. याबाबतचा प्रोमोही आता प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सलमान कपिल आणि त्याच्या संपूर्ण टीमसह धमाल-मस्ती करताना दिसत आहे. तसेच अर्चना पुरण सिंह व नवज्योत सिंह सिद्धू यांचीही झलक पाहायला मिळाली.
दरम्यान सलमानशी धमाल-मस्ती करत असताना कपिल त्याला आमिर व त्याच्या गर्लफ्रेंडबाबत विचारतो. कपिल म्हणतो, “आमिर भाईने चाहत्यांसह सगळ्यांनाच त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख करुन दिली. तो थांबतच नाही आणि तू लग्न करत नाही”. कपिलचं म्हणणं सलमानने ऐकून घेतलं. त्यानंतर सलमान अगदी गंभीर झाला. त्याने दिलेलं उत्तर ऐकून सगळेच हैराण झाले. कपिललाही यावेळी हसू अनावर झालं.
सलमान म्हणाला, “आमिरची गोष्टच वेगळी आहे. तो एक परफेक्शनिस्ट आहे. तो लग्न जोपर्यंत परफेक्ट करत नाही तोपर्यंत…”. वाक्य इतकंच अर्धवट म्हणत सलमान जोरदार हसू लागला. शोमध्ये उपस्थितांनाही यावेळी हसू अनावर झालं. मोजक्याच शब्दांत मिश्कीलपणे सलमानने आमिरची खिल्ली उडवली. प्रोमोवरुनच शोच्या पहिल्याच भागात बरीच धमाल-मस्ती अनुभवायला मिळणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. तर कृष्णा अभिषेक व सुनिल ग्रोवर सलमान व शाहरुख खानच्या लूकमध्ये स्किट सादर करणार आहेत. याची झलकही प्रोमोमध्ये पाहायला मिळाली.





