amol bawdekar heart attack : मराठी अभिनेते अमोल बावडेकर यांना नुकताच हृदय विकाराचा झटका आला असल्याचं समोर आलं. ‘सुंदर मी होणार’ नाटकाच्या प्रयोगाआधी त्यांना हार्ट अटॅक आला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर आपल्यामुळे प्रयोग रद्द होऊ नये म्हणून अमोल यांनी डॉक्टरांकडे तीन तासाची मागणी केली. फक्त तीन तास द्या प्रयोग करुन पुन्हा येतो असं त्यांनी म्हटलं. प्रकृती गंभीर असताना नाटकाचा प्रयोग करण्याची तयारी दाखवली हे कौतुकास्पद आहे. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याचं समोर आलं आहे. मराठी अभिनेते प्रशांत चौडप्पा यांनी अमोल यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली.
त्यांनी अमोल यांचा हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत त्याखाली कॅप्शन देत असं म्हटलं की, “डॉक्टर म्हणाले, THE KING IS BACK . आताच अमोलला भेटून आलो. एकदम मस्त टकाटक, नेहमी सारखाच एनर्जेटिक, आनंदी आणि हसरा. मी विचारलं काय रे काय हे?. तुला आणि Heart Attack ?? तर त्याच भलतंच, म्हणाला प्रयोग करायचा आहे रे, नाटकाचे प्रयोग नको थांबायला. निर्मात्यांच नुकसान होता कामा नये. माझ्यामुळे रविवारचा प्रयोग रद्द झाला. मला काय बोलाव कळेना. या पठ्ठ्याला दोन दिवसापूर्वी सकाळी ६ ला अस्वस्थ वाटलं म्हणून वहिनी प्रेरणा बावडेकर आणि फॅमिली फ्रेंड हितेश भाई यांनी हॉस्पिटलला आणलं तर तिथे समजलं हृदय विकाराचा तीव्र झटका आहे, ताबडतोब अँजिओप्लास्टी करावी लागेल”.
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “अमोलला याबाबत माहित नाही तो डॉक्टरांना म्हणतोय मला तीन तास सोडा माझा नाटकाचा प्रयोग आहे तितका करुन येतो. डॉक्टर म्हणाले ३ तास काय ३० दिवस इथून हलायच नाही. परमेश्वर कृपेनं आणि निष्णात डॉक्टरांच्या कृपेने अँजिओप्लास्टी पार पडली. सोमवारी ICU तून बाहेर आणलं. आज मंगळवार भेटायची परवानगी मिळाली. मी भेटायला गेलो तर हा एकदम फ्रेश जणू काही झालंच नाही. तेवढ्यात डॉक्टर आले म्हणून मी पळ काढत होतो पण म्हटलं डॉक्टर काय सांगतात ते ऐकायला म्हणून दाराबाहेर थांबलो”.
शेवटी त्यांनी असं म्हटलं, “डॉक्टरांचे शब्द कानावर पडले The King Is Back. You are perfectly All Right. तुमची इच्छा होती ना, लवकरच तुम्ही परत तुमचे प्रयोग करु शकाल. अमोल तु हाडाचा नाही ‘हृदयाचा’ कलाकार आहेस. आणि तुझं हृदय तुझ्या एकट्याच नाही खूप जणा-जणींच आहे. Come on Rock again Dear”.





