मराठी चित्रपटसृष्टीत करोडोंच्या घरात कमाई करणारा सर्वत पहिला चित्रपट ठरला तो म्हणजे ‘सैराट’. ‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन बदलला. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटामुळे दोन नवे चेहरे मराठी चित्रपटसृष्टीला लाभले. अभिनेत्री रिंकू राजगुरू व अभिनेता आकाश ठोसर म्हणजेच सर्वांचे लाडके आर्ची व परशा या जोडीने लाखो दिलांच्या हृदयावर राज्य केलं. (Rinku Rajguru and Akash Thosar)
सैराट चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून सर्वांनी या जोडीला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. आज चित्रपट प्रदर्शित होऊन बरीच वर्ष झाली असली तरी या चित्रपटातील आर्ची व परशा या जोडीला चाहते विसरलेले नाहीत. चित्रपटात दोघांभोवती फिरणारी हृदयस्पर्शी कथा साऱ्यांनाच विशेष भावली. या चित्रपटानंतर रिंकू व आकाश यांच्यातील मैत्रीही अगदी आहे तशीच आहे. दोघे भेटले की नेहमीच फोटो, व्हिडीओ शेअर करतात. अशातच रिंकू-आकाशने शेअर केलेले असेच काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
आमिर खानची लेक आयरा खान व नुपूर शिखरे यांच्या शाही रिसेप्शनसोहळ्याला रिंकू व आकाश यांना आमंत्रित करण्यात आलं होत. या सोहळ्याला रिंकू व आकाश यांनी एकत्र हजेरी लावलेली पाहायला मिळाली. यावेळी रिंकूने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. तसेच त्यावर घातलेल्या पारंपरिक दागिन्यांनी तिच्या महाराष्ट्रीयन लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होत. तर आकाशने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला.
रिंकू व आकाशने त्यांचे एकत्र हटके पोज देत काढलेले फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी “बऱ्याच दिवसानंतर” असं कॅप्शन दिलं आहे. “तारीख काय ठरली मग लग्नाची”, “साधं लग्न करु नका पळून लग्न करा”, “लग्न करून टाका. चाहते आधीच तुमच्यामागे वेडे झाले आहेत”, “लग्न करुन टाका” अशा अनेक कमेंट केल्या आहेत. ऑनस्क्रीन जोडीचे ऑफस्क्रीन रोमँटिक अंदाजातील फोटो पाहत नेटकऱ्यांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे.