झी मराठी वाहिनीवर नव्यानेच सुरू झालेली ‘पारू’ ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. मालिकेचे कथानक व कलाकारांच्या अभिनयाने या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. मालिकेतील पारू-आदित्य या जोडीसह पारू व तिची लाडकी वैजू यांची जोडीही प्रेक्षकांना चांगलीच आवडते. मात्र मालिकेच्या कथानकात नुकताच वैजू गायब झाल्याचे पाहायला मिळाले.
गणू व वैजू खेळत असतात तेव्हा चुकून वैजू बंगल्यात निघून येते. वैजू दिशाच्या पायाजवळ येते. दिशा त्या बकरीला पाहून घाबरते आणि अचानक तिचा तोल जात ती स्विमिंगपूलमध्ये पडते. दिशा व दामिनी नक्की ते जनावर कोणाचं होतं हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज चेक करतात. त्यावेळेला गणी त्या वैजूला घेऊन जाताना त्यांना दिसतो. त्यांनतर दामिनी व दिशा वैजूचा बंदोबस्त करुन पारूला अद्दल शिकवण्याचं ठरवतात.
वैजू हरवल्यामुळे पारूसह तिच्या चाहत्यांनाही वैजूची चिंता लागून राहिली आहे. याचनिमित्ताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे, ज्यामध्ये वैजू हरवली असल्याची बातमी देण्यात आली आहे. “आमच्या पारुची लाडकी वैजू हरवली आहे. सापडल्यास संपर्क करा” असं म्हणत ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
पारुची वैजू शोधून देणाऱ्यास बक्षीस म्हणून पारुच्या हातचे जेवण मिळणार असल्याचेही या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, दामिनी व दिशाने केलेल्या कारस्थानामुळे वैजू गायब झाली आहे. त्यामुळे आता दामिनीच्या कारस्थानामुळे वैजूचं काही बरं-वाईट तर झालं नसेल ना?, वैजू नक्की कुठे गेली असेल हे पारू शोधून काढणार का?, अहिल्यादेवींना वैजूबद्दल कळेल तेव्हा काय होणार?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.