झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. या प्रसिद्ध शोने गेली दहा वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले असून नुकताच या शोला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक खास भाग पार पडला. या शोने दहा वर्षे प्रेक्षकांना खदखदून हसवण्याबरोबरच टचकन डोळ्यातून पाणीही आणले आणि हसवण्याबरोबरच डोळ्यातून अश्रु आणण्याचे हे काम केले ते म्हणजे लेखक अरविंद जगताप व अभिनेता सागर कारंडेने.
‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये सागर कारंडेने नानाविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सागरने त्याच्या अनेक विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना हसवले तर आहेच, पण त्याच्या पत्रवाचनाने अनेकांच्या डोळ्यात नकळतपणे अश्रु निखळल्याचे पाहायला मिळाले आहे आणि अगदी तसाच काहीसा अनुभव पुन्हा एकदा आला आहे. सोशल मीडियावर सागच्या पत्रवाचनाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. याद्वारे त्याने प्रेक्षकांचे आभारही मानले आहेत.
आणखी वाचा – बायकोला पुरस्कार मिळताच प्रसाद जवादेचा आनंद गगनात मावेना, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “बायको…”
या व्हिडीओमध्ये सागर पत्र वाचताना असं म्हणतो की, “यशाचे हजारो बाप असतात, पण अपयश नेहमी अनाथ असतं. पण झी मराठीच्या कुटुंबामुळे आम्ही यश पचवू शकलो आणि सगळ्यात मोठा आधार होता तो म्हणजे मराठी माणसाचा. मराठी माणूस कुणाला हवेत जाऊ देत नाही. ताबडतोब जमिनीवर आणतो. मराठी प्रेक्षक फक्त कौतुक करतात असं नाही हा. वेळ आली की कान उघडणीही करतात. त्यामुळे आमचे पाय कायम जमिनीवर राहिले”.
दरम्यान, सागरचा हा पत्रवाचनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडीओला चाहत्यांनीही चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी सागरच्या पत्रवाचनाचे कौतुकही केले आहे. त्याचबरोबर अनेकजण पत्रवाचन ऐकून आम्ही खूप भावुक झाल्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.