बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या वांद्र्यातील घराला आग लागली असल्याचे वृत्त समोर येत आहे. जॅकलिनने काही महिन्यांपूर्वी वांद्र्यातील उच्चभ्रू ठिकाणी असलेल्या एका इमारतीत अलिशान घर खरेदी केले होते. वांद्रे पश्चिम येथील पाली हिल परिसरात ती राहत असलेल्या नवरोज हिल सोसायटीमध्ये ही आगीची घटना घडली असून या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओही समोर आला आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या १३व्या मजल्यावरील स्वयंपाकघरात ही आग लागली.
पीटीआयच्या वृत्तानुसार, एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले की, नर्गिस दत्त रोडवरील निवासी इमारतीत काल (६ मार्च) रोजी रात्री ८ च्या सुमारास आग लागली. नवरोज हिल सोसायटीच्या १४व्या मजल्यावर हे आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या, तीन जंबो टँकर आणि एक ब्रीदिंग व्हॅन तातडीने रवाना करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कुणालीही इजा झालेली नाही. तसेच ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
जॅकलिन फर्नांडिस या इमारतीतील आलिशान ५ बीएचके फ्लॅटमध्ये राहते. जॅकलिनने गेल्या वर्षी मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील पाली हिलच्या आलिशान परिसरात हा फ्लॅट खरेदी केला होता. या इमारतीमध्ये सुट, द पेंटहाऊस, स्काय व्हिला आणि मॅन्शन असे पर्याय आहेत. जॅकलिनचं नवं घर हे रणबीर कपूर, करीना कपूर यांच्या घराशेजारी आहे. तसेच जॅकलिनच्या घराच्या हाकेच्या अंतरावर सलमान खान व शाहरुख खानचंही घर आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर या आगीचा व्हिडीओ व्हायरल होत असून जॅकलिनच्या अनेक चाहत्यांनी तिच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी “आशा करतो की या ठिकाणी राहणारे सर्वजण सुरक्षित असू दे, जॅकलिनला काही झालं तर नाही ना?, सर्वानी काळजी घ्या” अशा कमेंट्सद्वारे या व्हिडीओखाली चिंता व्यक्त केली आहे.