आजही मैत्रीचं उदाहरण देताना अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, अशोक सराफ या कलाकारांना अग्रस्थान दिलं जातं. या त्रिकुटाची मैत्री आपण रुपेरी पडद्यावर पाहिलीच. मात्र खऱ्या आयुष्यातही या तिघांची मैत्री घट्ट होती. एकापेक्षा एक सिनेमे या तीनही कलाकारांनी प्रेक्षकांना दिले आहेत. यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या मैत्रीचेही सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळालं. असाच लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ यांच्या मैत्रीचा एक किस्सा सचिन पिळगांवकर यांनी मी होणार सुपरस्टार या रिऍलिटी शोच्या मंचावर सांगितला. (Sachin Pilgaonkar On Lakshmikant Berde)
सचिन पिळगांवकर व लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘एका पेक्षा एक’, ‘आयत्या घरात घरोबा’ यासारख्या अनेक चित्रपटांमधून एकत्रित काम केलं. तर सचिन पिळगांवकर व अशोक सराफ यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. मैत्रीचा एक किस्सा सांगत ते म्हणाले की, “अशोकचं आणि माझं नातं भावासारखं आहे. अशोकने एक वेगळ्या प्रकारची भूमिका माझ्या आयुष्यात निभावली आहे, ती म्हणजे मोठ्या भावाची”.
“आम्ही दोघे चित्रपटातून एकत्रित काम करत होतो तेव्हा माझी त्याच्याशी एक वेगळ्या प्रकारची मैत्री सुरू झाली, मग आमच्या दोघांमध्ये मैत्रीपूर्व नातं निर्माण झालं. आमच्या मैत्रीवर लक्ष्या खूप जळायचा. होय, कारण लक्ष्याबरोबर मी कधीच काम केलेलं नव्हतं. त्याला असं वाटायचं की मी काम नाही केलं म्हणून माझी सचिनबरोबर मैत्री झाली नाही. तो मला सारखं म्हणायचा की, एकदा तरी मी तुझ्यासोबत काम करूनच दाखवेन”.

यापुढे बोलताना सचिन म्हणाले, “मी त्याला नेहमी म्हणायचो थांब जरा वाट बघूया चांगल काहीतरी करुया आणि ती वेळ आली. चित्रपट अशी ही बनवाबनवीसाठी मी लक्ष्याला साईन केलं. चित्रपट करताना त्याला मजा आली सगळं झालं पण त्याच्या मनात एक धाकधूक होती की अशोक आणि सचिन एकमेकांच्या इतक्या जवळ आहेत तर चित्रपट पूर्ण झाल्यानंतर माझा रोल केवढा राहिल त्यात. ही धाकधूक त्याने मला नंतर बोलून दाखवली”.
“पण जेव्हा चित्रपट बनून पूर्ण झाला आणि त्याची ट्रायल बघून आम्ही बाहेर निघालो. आम्ही गाडीची वाट पाहत फुटपाथवर उभे होतो तेव्हा लक्ष्याचे डोळे डबडबलेले होते. मी त्याला विचारलं लक्ष्या तब्येत बरी आहे ना काय झालं. त्याने मला मिठी मारली आणि म्हणाला थॅक्यू हे एक मित्रच करु शकतो.”