‘बाईपण भारी देवा’ चित्रपटामुळे अभिनेत्री वंदना गुप्ते पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मात्र याआधीच त्यांनी नाटक, मालिका, चित्रपट या तीनही माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. विशेषतः नाटक या माध्यमांतून त्यांनी सिनेरसिकांच्या मनावर राज्य केलं. वंदना गुप्ते या स्पष्टवक्त्या अभिनेत्या आहेत. त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा साऱ्यांनाच भावतो. त्यामुळे त्यांचा खूप मोठा चाहतावर्गही आहे. तसेच सिनेसृष्टीतही वंदना गुप्ते यांना बरीच कलाकार मंडळी गुरुस्थानी मानतात. (Vandana Gupte On Husband)
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील वंदना गुप्ते यांची एनर्जी साऱ्यांना विशेष भावली. तसेच बऱ्याच प्रमोशनदरम्यान त्यांनी चांगलाच कल्ला केला. या चित्रपटात वंदना गुप्ते यांनी शशी हे पात्र साकारलं होत. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक होताना पाहायला मिळतंय. अशातच वंदना गुप्ते यांनी काही दिवसांपूर्वीच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या पार्टनरच्या खुपणाऱ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. याचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी वंदना गुप्ते यांना त्यांच्या नवऱ्याची खुपणारी गोष्ट कोणती याबद्दल प्रश्न विचारला. अवधूत गुप्ते म्हणाला की, “तुमच्या नवऱ्याची तुम्हाला कोणती सवय सगळ्यात जास्त खटकते”?. याला उत्तर देत वंदना गुप्ते म्हणाल्या, “त्याच स्वयंपाकघरात लुडबुड करणं, मला अजिबात आवडत नाही. जेव्हा मी मुलींना सांगते आपल्याला आज हे जेवण बनवायचं आहे. तेव्हा तो फोन करुन मेनू चेंज करतो. आणि काहीतरी घेऊन येतोय बाहेरून, आपण आज तेच खाऊया असं सांगतो, मला त्याची ही सवय खूप म्हणजे खूप खुपते”.
काही दिवसांपूर्वीच वंदना गुप्ते यांनी त्यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. पती शिरीष गुप्ते यांच्यासह त्यांनी लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी पुन्हा एकदा लगीनगाठ बांधली. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत अगदी साधेपणाने त्यांनी हा विवाहसोहळा उरकला होता. वंदना गुप्ते यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लग्नसोहळ्याचा व्हिडीओ शेअर देखील केला होता.