Shashank Ketkar Video: नुकत्याच महानगरपालिकांच्या निवडणूक पार पडल्या. तर आज या निवडणुकांचा निकाल असून सामान्य माणसांपासून ते कलाकारांपर्यंत सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावत मतदान केलं. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर मतदान करण्याचं आवाहन देखील केलं. इतकंच नव्हे तर सामान्य नागरिकांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मतदान करण्याचं आवाहन केलं. लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरनेही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलेला. हा व्हिडिओ शेअर करत त्याने ज्या शाळेत मतदान केलं, त्या शाळेच्या बाहेरचा कचराही दाखवला. आता यानंतर त्याने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओची दखल घेण्यात आली असून शाळेच्या बाहेरचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत शशांक म्हणाला, “आपण सगळ्यांनी मतदान केलं, मी सुद्धा मतदान केलं. ज्या शाळेत मतदान केलं त्या शाळेच्या बाहेरच्या परिसरातील कचऱ्याचा व्हिडीओ पोस्ट केला. तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. खूप लोकांनी तो व्हिडीओ शेअर केला, अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला. अनेकांनी सांगितलं की, तू असाच निर्भीडपणे कायम बोलत जा, आपल्या समाजासाठी तू कायम असा झटत राहतोस हे करत राहा. अनेकांनी मला ट्रोल देखील केलं, प कौतुक आणि ट्रोलिंग हे दोन्ही मी सामान पातळीवर मोजतो. कारण मला माहित आहे यासगळ्यामागे एक नागरिक म्हणून माझं काय उद्दिष्ट आहे.” (Shashank Ketkar Video)
शशांकने हा व्हिडिओ शेअर करत त्यानं ज्याकरिता व्हिडिओ शेअर केलेला, त्याची दखल घेतली गेली, हे दाखवलं आहे. शाळेबाहेरचा कचरा उचलण्यात आला असून तिथला परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. याचे फोटो देखील शशांकने शेअर केले आहेत. शशांक पुढे म्हणाला, “सकाळी मी तो कचऱ्याचा व्हिडिओ टाकला आणि लगेच त्यावर ऍक्शन घेण्यात आली. ज्यांनी यावर ऍक्शन घेतली, माझं त्यांच्याशी बोलणं झालं. कुठेही कचरा होतो आहे, अपघात होत आहेत, फुटपाथवर दुकानं लावली जात आहेत, याबद्दल आम्हा नागरिकांना तुम्हाला अशा व्हिडिओमार्फत सांगावं लागतं. ही खरंतर दुर्दैवाची बाब आहे. तुम्ही खरंतर आमचे पालक आहात. पालकांचं सगळ्यांकडे लक्ष असलं पाहिजे, असं मी त्यांना सांगितलं. मी कायम माझ्या परिसरासाठी व्होकल राहणार आहे आणि मला असं वाटतं मला ट्रोल करण्यापेक्षा व्होकल व्हा.” (Shashank Ketkar Video)




