ankita walawalkar first makar sankrant celebration video : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. महिलावर्गात या सणाची खूप उत्सुकता असते. नवविवाहित जोडपं लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत अगदी थाटामाटात साजरी करतात. यंदाची ही मकर संक्रांत ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकरसाठी खूप खास होती. अंकिता आणि कुणालने त्यांच्या लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत मुंबईत साजरी न करता गावी साजरी केली. सासुबाईंच्या इच्छेखातर अंकिताने हा सण गावी साजरा केला आणि इतकंच नाहीतर गावातील ३५० बायकांसाठी त्यांनी हळदकुंकूं केलं. याची झलक तिने व्हिडीओद्वारे इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
या व्हिडीओमध्ये अंकिताच्या माहेरची आणि सासरची मंडळीही सहभागी होताना दिसली. मकर संक्रांतसाठी अंकिताने खास काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने परिधान केले होते. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर कुणालनेही काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. सुरुवातीलाच अंकिता व कुणालच्या पहिल्या संक्रातीला सुंदर डेकोरेशन केलं होतं. हळदीकुंकूसाठी खास महिलांसाठी बसायची व्यवस्थाही केली होती.
A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)
हळदी कुंकू स्पेशल व्हिडीओ शेअर करत अंकिताने असं म्हटलं की, “मुंबईत हळदीकुंकू मोठ्या थाटात करायचं असं ठरलं होतं. पण नंतर कळलं की, सासूबाईंची इच्छा आहे पहिली संक्रांत गावी करायची. क्षणभर मी पेचात पडले. आता नेमकं काय करायचं?, मुंबई की गांव? पण मनाशी विचार केला खरा आनंद कुठे मिळेल? लोकांच्या डोळ्यात समाधान कुठे दिसेल? आणि उत्तर आपोआप सापडलं. गावांत. संक्रांतीच्या दिवशी जवळपास ३५० बायकांसाठी आम्ही गावांत हळदीकुंकू केलं”.
शेवटी तिने असंही म्हटलं की, “मनापासून दिलेले आशीर्वाद, चेहऱ्यावरचं समाधान आणि कार्यक्रमानंतरचं ते समाधानाचं हसू. सगळंच खूप छान आणि अविस्मरणीय होतं. हा कार्यक्रम मोठेपणाचा नव्हता, तर आपुलकीचा, माणुसकीचा आणि आनंदाचा होता. तिळगुळाच्या गोडीत… नात्यांची गोडी वाढो”. अंकिताच्या मकर संक्रात स्पेशल व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव झालेला पाहायला मिळत आहे.




