कलाकार मंडळी अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अनेकदा ही कलाकार मंडळी नेटकऱ्यांच्या कचाट्यात अडकतात. काही वेळेला ते ट्रोलर्सला प्रतिउत्तर देतात तर कित्येकदा ते दुर्लक्षही करतात. नवनवीन फोटो, व्हिडीओ ही कलाकार मंडळी शेअर करत असतात. विशेषतः त्यांच्या बालपणीच्या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केलेल्या बालपणीच्या फोटोंची चांगलीच चर्चा रंगली आहे. (Vidisha Mhaskar Share Childhood Photo)
सोशल मीडियावर सध्या एका मराठमोळ्या खलनायिकेचा फोटो वाऱ्यासारखा पसरला आहे. आजवर या अभिनेत्रीने छोटा पडदा चांगलाच गाजवला. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय खलनायिका म्हणून सध्या तिचं नाव साऱ्यांना माहित आहे. ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेतील सावनी ही भूमिका साकारून तिने प्रेक्षकांची मन जिंकली. त्यानंतर ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील आयेशा ही भूमिका साकारून तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तर ‘३६ गुणी जोडी’ मालिकेतील तिची सारिका ही भूमिका घराघरांत पोहोचली. ही मराठमोळी अभिनेत्री आहे विदिशा म्हसकर. खलनायकी अंदाजात तिने प्रेक्षकांच्या मनावर कायमच राज्य केलं आहे.
आता मात्र ‘हरवली आहे’ असं म्हणत विदिशाने शेअर केलेल्या एका फोटोची विशेष चर्चा रंगली आहे. हा विदिशाचा बालपणीचा फोटो आहे. शालेय दिवसातला, चष्मा घातलेला हा विदिशाचा निरागस फोटो साऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय. या फोटोवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदेने विदिशाच्या या फोटोवर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, “अगं ती मला सापडली आहे. आता मी माझ्याकडेच ठेवणार आहे.” रेश्माच्या या कमेंटवर प्रतिक्रिया देत विदिशा म्हणाली, “हाहाहा…तुझ्या घरात जागा देशील का गं?”.
तर विदिशाच्या या फोटोवर एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “ही हरवण्यासारखीच आहे… बरं झालं हरवली ते”, या कमेंटवर विदिशाने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, “का रे, एवढी पण वाईट नव्हती, innocent होती”. तर एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, “नियतीचा खेळ – निरागस मुलगी झाली खलनायिका”. तर दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट करत लिहीलं आहे, ‘ही हरवली आहे आणि आता मोठी स्टार झाली आहे.”