मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेविश्वातही आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. नामांकित रिऍलिटी शोमधूनही अमृताने स्वतःच नाव मोठं केलं. मात्र अमृताला खरी ओळख मिळाली ती ‘चंद्रमुखी’ या चित्रपटामुळे. ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्याची क्रेझ अजूनही आहे. या ‘चंद्रा’ गाण्यामुळे अमृताला विशेष लोकप्रियता मिळाली. प्रेक्षकांच्या या लाडक्या अमृताला अनेकदा ट्रोलींगचा सामना ही करावा लागला आहे. अनेकदा तिने या ट्रोलर्सला कमेंट करत प्रतिउत्तर दिलं आहे. (Amruta Khanvilkar On Trollers)
काही दिवसांपूर्वी अमृताने स्वतःच असं युट्युब चॅनेलही सुरु केलं आहे. त्यावर ‘तिकीट टू महाराष्ट्र’ या नवीन सुरु केलेल्या सीरिजवरूनही अमृताला नेटकऱ्यांना सामोरं जावं लागलं. दरम्यान नेटकऱ्यांच्या घाणेरडया येणाऱ्या कमेंट्सवर अमृताने वाचा फोडली आहे. सर्रास शिवीगाळ करणाऱ्या, घाणेरड्या शब्दांत बोल लगावणाऱ्या नेटकऱ्यांना आता अमृता सामोरी जाणार असल्याचं तिने सांगितलं. नुकत्याच ‘वायफळ’ या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अमृताने नेटकऱ्यांना आता ती कशी सामोरी जाणार, याबद्दल सांगितलं आहे.
ट्रोलर्सबद्दल बोलताना ती म्हणाली, “मला फार टोकाचं ट्रोलिंग नको वाटतं आणि मुलगी असल्यामुळे नको त्या गोष्टींवरपण आम्हाला ट्रोल केलं जात. मग मी काय करते जे कोणी असे घाणेरड्या कमेंट करतात, कधी कधी ठीक आहे पण कधी उगीच शिव्या असतात, कधी उगीच काहीही बोललं जातं, त्यांना मी एक मेसेज करते की यापुढे जर का मी तुमची कमेंट बघितली ना तर मी थेट सायबर क्राइमवाल्यांकडे तक्रार करणार. हे अकाउंट रिपोर्ट करणार आणि मी बघणार की हे जे काही आहे ते बंद होईल. कारण मी असा विचार करते की चला मी आज एक अभिनेत्री आहे. एक पब्लिक फिगर आहे. पण जर मी एक साध्या घरातली मुलगी असते तर मी हे केलं असतं का? तर हो. तुम्हाला जर मी आवडत नाही आहे ठीक आहे. तुम्ही तिकडे येऊन घाण करू नका. तुम्ही माझ्या पेजवर येऊन घाण करू नका.”
पुढे ट्रोलर्सबद्दल राग व्यक्त करत अमृता म्हणाली, ‘तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही चार मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये बोला. माझ्या पेजवर येऊन घाण करायची नाही. मी असे अनेक अकाउंट रिपोर्ट केले आहेत. कारण त्यांना ना नाव असतं, ना चेहरा असतो. सेक्सी बॉय १२३४ अशी नावं असतात. असशील बाबा तुझ्या घरी. तुम्हाला काम आवडलं नाही तुम्ही बोला, आम्हाला हे नाही आवडलं, हे ठीक आहे. कधी कधी काय तर ओव्हर अभिनय करते, आता या वयात हे, अरे यार काय चाललंय तुमचं. कुठल्या वयात काय करायचं? कोण आहेस तू? माझा बाबा आहेस? आई आहेस? भाऊ आहेस? बाकी ते शिव्या वगैरे तर पूर्ण बंद, ब्लॉक, रिपोर्ट.” असं म्हणत तिने राग व्यक्त केला.