काळा रंग हा तसा अनाकलनीयच. एखाद्या रंगाची अनुपस्थिती म्हणजे काळा रंग. भयानक, मृत्यू, विनाश, गांभीर्य, दुर्दैव, दु:ख यांचे चित्रण काळा रंग करतो. त्यामुळे इतर रंगांपेक्षा काळ्या रंगाचा विचार तसा गांभीर्याने न केलेलाचं दिसून येतो. रंगामध्ये होणारा हा भेद माणसा-माणसांतदेखील होतानाचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. गोऱ्या माणसांमध्ये एखाद्या काळ्या किंवा कृष्णवर्णीय रंगाच्या माणसाने प्रवेश करताच त्याला साहजिकच अपमानास्पद वाटते.
सामाजिक क्षेत्रासह मनोरंजन क्षेत्रातही काळ्या रंगावरुन होणाऱ्या भेदाला अनेकदा अनेकांना सामोरे जावे लागले आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक वैभव घुगेलाही त्याच्या सावळ्या रंगामुळे अपमानास्पद वागणूक दिली गेली असल्याचे म्हटले आहे. मराठीसह हिंदी टेलिव्हिजनमध्ये आपल्या नृत्यविष्काराने सर्वांना मोहित करणारा वैभव घुगे एकेकाळी बॅकडान्सर म्हणून काम करत असे. मात्र यावेळी त्याच्या सावळ्या रंगामुळे त्याचा अनेकदा अपमान झाला असल्याचा खुलासा त्याने केला आहे.
स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रोमोद्वारे काळ्या रंगामुळे केल्या जाणाऱ्या द्वेषाबद्दलचे एक सादरीकरण दाखवण्यात आले आहे. याच व्हिडीओमध्ये पुढे वैभवने “मी यातून गेलो आहे. माझा रंग केवळ काळा असल्यामुळे मला अनेकदा फ्रेममधून हटवले गेले” असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच “खूप जणांना काळ्या रंगाबद्दल द्वेष, मत्सर किंवा राग वाटतो आणि लोकांमधली ही मानसिकता बदलली पाहिजे.” असंही त्याने म्हटलं आहे.
आणखी वाचा – सात वर्षांनी अप्पी-अर्जुनची भेट, मात्र लेकाला भेटण्यासाठी घातली अट, बाप-लेकामधील दुरावा कधी संपणार?
त्याचबरोबर या व्हिडीओच्याखाली कॅप्शनमध्ये वैभवने “जर कराटेमधील काळया रंगाच्या बेल्टला महत्त्व आहे. नजर काढण्यासाठी आपण काळ्या रंगाचा टीका लावतो किंवा पदवीधर झाल्यानंतर आपण काळ्या रंगाचा कोट परिधान करतो. मग काळ्या रंगाचा इतका तिरस्कार का करावा?” असा प्रश्नही उपस्थित केला आहे. तसेच “सर्व रंगाचा आदर करा” हे समजण्यासाठी एक सादरीकरण असल्याचेही त्याने यामध्ये म्हटले आहे.
दरम्यान, वैभवने आजवर अनेक हिंदी रिऍलिटी शोमध्ये कॅप्टनची जबाबदारी पार पाडली आहे. हिंदीबरोबरच मराठीमध्येही आपल्या अनोख्या नृत्यशैलीने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच तो सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’च्या कार्यक्रमाचे परीक्षण करत आहे. याआधीच्या पर्वातही त्याने कॅप्टनची जबाबदारी पार पाडली होती.