सध्या रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर बराच धुमाकूळ घालत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई करत बरेच रेकॉर्ड मोडले. चित्रपटात रणबीरसह अभिनेता बॉबी देओल, अनिल कपूर, अभिनेत्री रश्मीका मंदाना हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले. एकीकडे या चित्रपटाची सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली असताना दुसरीकडे आपल्या मराठमोळ्या कलाकाराने या चित्रपटात चांगलीच रंगत आणलेली पाहायला मिळत आहे. ते कलाकार म्हणजे अभिनेता उपेंद्र लिमये. चित्रपटात मध्यांतरापूर्वी उपेंद्र यांची एंन्ट्री होते आणि त्यांच्या एंन्ट्रीवर नुसता टाळ्यांचा कडकडात सध्या चित्रपटागृहात पाहायला मिळत आहे. उपेंद्र यांचा चित्रपटातील अभिनय व हटके अंदाज मराठी प्रेक्षकांनाच नाही तर जगभरातील प्रेक्षकांना वेड लावत आहे. त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेसाठी सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. पण त्यांच्या कुटुंबियांची यावर काय प्रतिक्रिया आहेत हे त्यांनी नुकत्याच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. (Upendra Limaye told about his family reaction)
ब्लॉकबस्टर चित्रपटातील उपेंद्र यांचा अभिनय सगळ्यांच लक्ष वेधत आहे. तर तुमच्या घरच्यांना नेमकं कसं वाटत आहे? या प्रश्नावर उत्तर देताना उपेंद्र सांगतात की, “घरचे तर खूप खूश आहेत. माझा मुलाला व मुलीला तर ते सेलिब्रेटी झाले आहेत असं वाटत आहे. सगळ्यांकडून त्यांना प्रतिक्रिया येत आहेत की ‘तुमचे बाबा… तुमचे बाबा… काका … काका….’ असं म्हणत बरेच मॅसेज येत आहेत आणि त्या प्रतिक्रिया ते मला पाठवत आहेत. माझ्या मुलाची रशियातील मैत्रीण तसेच इतर परदेशातला त्याचा मित्रपरिवार मुलाला मॅसेज करत आहे त्यामुळे ते दोघं बरेच खूश आहेत. इतक्या मोठ्या स्थरावर एवढं छान सगळं कौतुक होत आहे. हे सगळं पाहून मलाही खूप मजा वाटत आहे”.
याबाबत उपेंद्र पुढे सांगताना म्हणाले, “इतकंच काय आजूबाजूचे जे ओळखीचे लोक आहेत त्यांनाही त्यांच्या ओळखीचे लोक मॅसेज करुन सांगतात की आम्हाला खूप छान वाटतं की उपेंद्र लिमये तुमच्या ओळखीचे आहेत ना! आमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवा. इतक्या स्थरापर्यंत या भूमिकेची क्रेझ सगळीकडे पोहोचली आहे. त्यामुळे मला खूप छान वाटत आहे. चित्रपटाच्या मध्यांतरानंतर माझा सीन येतो. त्यामुळे प्रत्येक मध्यांतरानंतर मला व्हिडीओ, मॅसेज येत आहेत. त्यामुळे माझा फोन सध्या सायलेंट असतो”, असं म्हणत त्यांच्या भूमिकेचा क्रेझ व कुटुंबालाही वाटणारं कौतुक याबाबत वक्तव्य केलं.
सध्या या चित्रपटाचा क्रेझ सगळीकडे पाहायला मिळत आहे. पण या सगळ्यात उपेंद्र यांची भूमिका व त्यांचे डायलॉग विशेष लक्षवेधी ठरत आहेत. चित्रपटात बरेच मोठे स्टारकास्ट पाहायला मिळत असले तरीही उपेंद्र यांची भूमिका सगळ्यांना चांगलीच भावली आहे. आता हा चित्रपट नेमके किती रेकॉर्ड मोडतो आणि किती रेकॉर्ड बनवतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.