यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ठरले. हा पुरस्कार जाहीर होताच सर्व स्तरांतून त्यांचं कौतुक केलं जात आहे. आजवर मालिका, चित्रपट, नाटक या तीनही क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केल्यानंतर अभिनेते अशोक सराफ यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशोक सराफ यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. हा पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ यांचं रसिक मनाचे राजकारणी राज ठाकरे यांनी ट्विट करत अभिनंदन केलं. (Raj Thackeray On Ashok Saraf)
राज ठाकरे नेहमीच कलाकारांच्या कलेला पाठिंबा देताना दिसतात. अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. “अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला, त्याबद्दल अशोक सरांचे मनापासून अभिनंदन. मी मागे एकदा म्हणालो तसं, एकाच वेळेला सिनेमा, रंगभूमी व टीव्ही या तीनही माध्यमांवर हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार या देशाने खूप कमी पाहिले, अशोक सर त्यातले एक” असं ते म्हणाले आहेत.
श्री. अशोक सराफ ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला, त्याबद्दल अशोक सरांचे मनापासून अभिनंदन. मी मागे एकदा म्हणालो तसं, एकाच वेळेला सिनेमा, रंगभूमी आणि टीव्ही ह्या तिन्ही माध्यमांवर हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार ह्या देशाने खूप कमी पाहिले, अशोक सर त्यातले एक.
— Raj Thackeray (@RajThackeray) January 30, 2024
मराठीत… pic.twitter.com/TdC0RUwtct
यापुढे ते म्हणाले की, “मराठीत कलाकारांचा अजिबात तुटवडा नाही, पण आपल्या भाषेच्या सीमा ओलांडून एखादा नट देशव्यापी ओळखला जातो किंवा त्यासाठी प्रयत्न करतोय असं दिसत नाही. पण अशोक सर या बाबतीत देखील अपवाद ठरले. महाराष्ट्र भूषणसारखे राज्यातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कलाकारांना ते उमेदीत असताना मिळावेत असं मला वाटतं. अर्थात हे प्रत्येक वेळेला होतंच असं नाही पण अशोक सरांच्या बाबतीत राज्य सरकारने योग्य टप्प्यावर त्यांचा उचित सन्मान केला याबद्दल राज्य सरकारचं पण मनापासून अभिनंदन”, असं म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया देत असं म्हटलं की, “‘महाराष्ट्र भूषण” हा महाराष्ट्राचा नंबर वन पुरस्कार आहे असं मी समजतो. गेली ५० वर्षं मी चित्रपट, नाटक, मालिका करत आहे त्यातली मेहनत कुठेतरी सत्कारणी लागली अन् प्रेक्षकांनीही त्याला दाद दिली त्याचा मला प्रचंड आनंद आहे”, असं अशोक सराफ म्हणाले.