टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने पती विकी जैनबरोबर ‘बिग बॉस’मध्ये एकत्र प्रवेश केला होता. शोमध्ये दोघेही आपापले गेम उत्तम खेळताना दिसले. बरेचदा या जोडीच्या वाद-विवादामुळे दोघेही चर्चेत आले. अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरात इतर स्पर्धकांशी सुशांतबद्दल अनेकदा भाष्य केलं होतं. अंकिता शोमध्ये सुशांतचे नाव सहानुभूतीसाठी घेत आहे जेणेकरून त्याचे चाहतेही तिला पाठिंबा देतील, अशी चर्चा सर्वत्र पसरली होती. मात्र अंकिता लोखंडेचा नवरा विकी जैन याविषयी कधीच काही बोलला नाही. (Vicky Jain On Sushant Singh Rajput)
अंकिता व सुशांत तब्बल सहा ते सात वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. पण काही कारणांस्तव त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला. त्यानंतर अंकिताच्या आयुष्यात विकी आला. ‘बिग बॉस’च्या घरात अंकिताला सुशांतबद्दल बोलण्यापासूनही विकीने कधीच रोखले नाही. अंकिताने शोमध्ये सुशांतचे नाव वारंवार घेतल्यानंतर आता विकी जैनने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘गल्लाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत विकी जैनने त्याच्या बिग बॉसच्या प्रवासाविषयी सांगितले आणि तो शोमध्ये असताना पडद्यामागे काय चालले होते यावरही प्रतिक्रिया दिली.
विकी म्हणाला की, “कधी कधी नात्यात अनेक गोष्टी घडत असतात ज्यासाठी आपण तयार नसतो. अशा परिस्थितीत तुम्ही एकमेकांना कसे सपोर्ट करता, ते नाते कसे मजबूत करता हे पाहावं. अंकिता व सुशांतचे काय झाले ते मला माहीत आहे. मला त्याच्याबद्दल सर्व काही माहित होते आणि त्यामुळे आमचे नाते खूप सकारात्मक होते. मला या सर्व गोष्टींची पर्वा नाही. मी खूप प्रॅक्टिकल आहे” असंही तो म्हणाला.
विकी पुढे म्हणाला, “प्रॅक्टिकल असणं महत्त्वाचं आहे, या गोष्टी घडत राहतात. अंकिताच्या मनात सुशांतबद्दल काय भावना आहेत हे मला माहीत आहे. याबाबत मी असुरक्षित नाही” असंही तो म्हणाला. अंकिता व विकी नेहमी शोमध्ये भांडताना दिसले. दोघांना नेहमीचं भांडताना पाहून लोकांना वाटू लागले की, दोघेही घराबाहेर पडल्यानंतर घटस्फोट घेतील. घटस्फोटाच्या मुद्द्यावरही विकीने या मुलाखतीदरम्यान भाष्य केलं. विकी म्हणाला की, “आमच्यामध्ये सर्व काही ठीक आहे”.