छोट्या पडद्यावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका सध्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेत सध्या मुक्ता व सागर यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. मालिकेत आनंदाचं वातावरण असताना या आनंदावर पाणी फेरायला सावनी एंट्री घेते. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही मालिकेत सावनीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. आजवर अपूर्वाने रात्रीस खेळ चाले, ‘बिग बॉस’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मंदिर अधिराज्य गाजवलं. (Apurva Nemlekar Premachi Goshta)
यानंतर आता अपूर्वा प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेतही अपूर्वा खलनायिकेची भूमिका साकारताना दिसत आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ अपूर्वाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. अपूर्वाने शेअर केलेल्या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. तिने चक्क मुक्ता-सागरच्या लग्नामध्ये तुफान डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सागर आणि मुक्ता यांच्या लग्नसोहळ्याचे खास क्षण दाखवले जात आहे. अलीकडेच साखरपुडा, मेहंदी, संगीत, हळद हे समारंभ पार पडले आहेत. मालिकेत सावनीची भूमिका अपूर्वा नेमळेकर साकारत आहे. ही सावनी मुक्ता-सागरच्या लग्नात येऊन राडा करते. हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करते. एकीकडे लग्नात येऊन गोंधळ घालणारी सावनी आणि दुसरीकडे त्याच लग्नाच्या मंडपात तुफान नाचणाऱ्या अपूर्वाला पाहून साऱ्यांनाच धक्का बसला.
अपूर्वाने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असे लिहिले आहे की, ‘लग्न कोणाचंही असो, मी नाचायला कायम रेडी असते. बिहाइंड द सीन फन टाइम’. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ मालिकेचे दिग्दर्शक गिरीश वसईकर यांनी शूट केला आहे. इंद्रा, बापू, लकी आणि सागरचा मामा ही मंडळीही अपूर्वासह डान्स करताना दिसत आहेत. अभिनेत्रीच्या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. “नावाप्रमाणे शोभलस शेवंता”, “शेवंता, अण्णा नाईक गोळ्या घालतले”, “अगं स्वतःच्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नात स्वतःच नाचते आणि तुमचं तर भांडण आहे ना तरी गेलीस लग्नाला, बिनलाजी शेवंता” अशा कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केलेल्या पाहायला मिळत आहेत.