मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरु असून ‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच प्रथमेशचा क्षितिजाबरोबर साखरपुडा सोहळा पर पडला. या सोहळ्याचे काही खास क्षण दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. साखरपुड्यात प्रथमेशने केलेला डान्सही साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. यावेळी अभिनेत्याने शाहरुख खानच्या गाण्यावर ठेका धरत हटके डान्स स्टेप्स केल्या. तर या डान्समध्ये क्षितिजानेही प्रथमेशला चांगलीच साथ दिली.
अशातच प्रथमेश नुकताच क्षितिजाच्या घरी श्रीवर्धन येथे गेला आहे आणि त्याच्या होणाऱ्या सासरी प्रथमेशचे अगदी गोड आदरातिथ्य करण्यात आले आहे. सासरवाडीत जावयाचे होणारे गोड कौतुक पाहून प्रथमेशही भारावून गेला असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्याचे श्रीवर्धनमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. प्रथमेशने इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या रांगोळीचा फोटो शेअर केला असून रांगोळीवर “सासुरवाडीत स्वागत आहे” असं लिहिलं आहे.

त्याचबरोबर क्षितिजानेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रथमेशबरोबरचा रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. दोघांनी घरच्या अंगणात बसून क्युट पोज देत एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोवर तिने प्रथमेशला लाडाने जावई म्हणत “जावई अॅट सासुरवाडी” असं लिहिलं आहे. तसेच यावेळी दोघांनी श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी एकमेकांबरोबर निवांत वेळही घालवला. क्षितिजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एकमेकांच्या हातात हात घातलेला एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी प्रथमेश-क्षितिजा यांचा साखरपुडा सोहळा पार पडल्यानंतर लगेचच १० दिवसांनी म्हणजेच येत्या २४ फेब्रुवारी रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.