सुप्रसिद्ध अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी सुहानीने या जगाचा निरोप घेतला आहे. तिच्या निधनाच्या बातमीने सुहानीचे चाहते दु:खी झाले आहेत. ‘दंगल’ गर्लच्या पुनरागमनाची प्रेक्षक वाट पाहत होते, पण तिच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना हादरवून सोडले. सध्या सिनेसृष्टीतून अत्यंत दु:खद बातम्या समोर येत आहे. अशातच सुहानीच्या निधनाच्या बातमीने साऱ्यांना धक्का दिला. ‘दंगल गर्ल’ सुहानी भटनागर हिला आमिर खानची मुलगी म्हणून प्रसिद्धी मिळाली. ‘दंगल’ या चित्रपटातून प्रसिद्ध झालेली सुहानी भटनागर आता या जगात नाही. (Suhani Bhatnagar Death)
फरिदाबाद येथील रहिवासी असलेल्या सुहानी भटनागरच्या मृत्यूचे कारण संपूर्ण शरीरात पाणी झालं असल्याने झालं असल्याचं समोर आलं. काही काळापूर्वी सुहानीचा अपघात झाला होता, त्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. सुहानीने उपचारासाठी घेतलेल्या औषधांचे असे दुष्परिणाम झाले की तिच्या शरीरात हळूहळू पाणी साचू लागले. दरम्यान, तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
सुहानी भटनागर हिचे वयाच्या १९व्या वर्षी निधन झाले आहे. आमिर खानची ऑन-स्क्रीन लेक अशी प्रसिद्धी मिळाल्यानंतर बरीच वर्षे सुहानी सिनेसृष्टीपासून दूर होती. सुहानी भटनागर ही बॉलिवूडच्या प्रसिद्ध बालकलाकारांपैकी एक होती. आमिर खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘दंगल’ (२०१६) मधून तिला प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात तिने ज्युनियर बबिता फोगटची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. याशिवाय अभिनेत्रीने अनेक टीव्ही जाहिरातींमध्येही काम केले होते.
‘दंगल’ चित्रपट केल्यानंतर सुहानी भटनागरकडे चित्रपटांची रांग लागली असती, पण अभिनेत्रीने नेमका त्याचवेळी सिनेसृष्टीतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. सुहानीला अभिनयक्षेत्रात पुढील करिअर करण्याआधी अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे होते. सुहानीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते की, ती अभ्यासानंतर पुन्हा सिनेमात परतणार आहे. सुहानी भटनागर २५ नोव्हेंबर २०२१ पासून इन्स्टाग्राम अकाऊंटवर सक्रिय नव्हती. मात्र, याआधी तिने अनेकदा तिचे फोटोही शेअर केले आहेत. सिनेसृष्टीत आल्यानंतर सुहानी पूर्वीपेक्षा जास्त ग्लॅमरस झाली होती. सुहानी या जगात नसली तरी ‘दंगल’मधील तिची भूमिका कायम लक्षात राहील.