बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल व हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ईशा व भरत तख्तानी यांनी नुकतेच कायदेशीररित्या वेगळे होण्याचा निर्णय घेत असल्याचे जाहीर केलं होतं. ईशाच्या घटस्फोटाच्या निर्णयाला आई हेमा यांचा पाठिंबा मिळाला असल्याचं पाहायला मिळालं. दोघांच्याही लग्नाला १२ वर्षे झाली असून त्यांना दोन मुली आहेत. पण ईशाच्या या निर्णयामुळे वडील धर्मेंद्र यांना धक्का बसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने दिली आहे. (Dharmendra on isha deol divorce)
ईशा व भरत या जोडीने काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेणार असल्याची घोषणा केली होती. यावर माध्यमांमधून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. आई हेमा यांचादेखील लेकीच्या घटस्फोटाला पाठिंबा असल्याचे समोर आलं. अशातच ‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, ईशाचे वडील धर्मेंद्रजी घटस्फोटाच्या निर्णयावर नाराज असल्याचे त्यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले आहे. “आपल्या मुलांचा संसार तुटताना कोणत्याही आई-वडिलांना आनंद होत नाही. संसार टिकवणे हे आपल्या हातात असते. त्यामुळे घटस्फोटाच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा,” असे धर्मेंद्र यांचे म्हणणे असल्याचे समोर आलं.
पुढे ते म्हणाले की, “ईशा व भरत हे दोघीही देओल कुटुंबाचे लाडके आहेत. या दोघांनीही खुश राहावे अशी सर्वांचीच इच्छा आहे.” ईशा व भरतच्या घटस्फोटाच्या निर्णयावर धर्मेंद्र नाराज आहेत, त्यामुळे पुन्हा विचार करुन निर्णय घ्यावा असा त्यांना वाटत आहे. ईशा व भरत यांना राध्या व मीराया या दोन मुली आहेत. दोन्ही नाती आजी आजोबांच्या अगदी जवळच्या व लाडक्या आहेत.
ईशा-भरत २०१२ मध्ये लग्न बंधनात अडकले. दोघेही त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात खुश होते. पण सूत्रांच्या माहितीनुसार, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर दोघांच्याही नात्यात दुरावा आला आणि मतभेदही वाढले. ‘दिल्ली टाइम्स’च्या वृत्तानुसार, “आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यासाठी आमच्या मुलींचे हित हे आधी असेल. तसेच आमच्या गोपनीयतेचा आदर केला जावा.” असं म्हणत त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली होती.