अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे कायमच चर्चेत असतात. अशातच नाना एका व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वाराणसी येथे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नानांनी एका चाहत्याला फटकावल्याचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओमुळे ते नेटकऱ्यांच्या चांगलेच कचाट्यात सापडले. या व्हिडीओवरुन सोशल मिडियासह अनेक माध्यमांवर नानांना ट्रोल केले गेले आणि नेटकऱ्यांकडून ते टीकेचे धनी झाले. बऱ्याच जणांनी यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. (Director Statement On Nana Patekar Slap Fan Viral Video)
या संपूर्ण प्रकरणावर नानांनी स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. नानांनी स्पष्टीकरण देतानाचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. “या व्हिडीओमधील मुलगा नक्की कोण होता? हे मला माहित नव्हते. मला तो मुलगा आमच्याच टीममधला मुलगा वाटला आणि आम्ही आधी २ वेळा रिहर्सल केल्याप्रमाणे आणि दिग्दर्शकाने सांगितल्यानुसार मी त्याला कानाखाली मारली. पण ज्याला मारलं तो टीममधील नसून दुसराच कुणीतरी होता, हे मला नंतर कळलं. यानंतर मी त्याला शोधले पण तेवढ्यात तो तिथून पळून गेला होता आणि हा व्हिडिओ त्याच्या मित्राने शूट केला असण्याची शक्यता आहे.” असं म्हणत स्पष्टीकरण दिलं आहे.
आणखी वाचा – चाहत्याला फटकावल्यानंतर नाना पाटेकरांचं स्पष्टीकरण, व्हायरल व्हिडीओ पाहून म्हणाले, “मी त्याला मारलं आणि…”
या सगळ्या प्रकरणावर आता दिग्दर्शक अनिल शर्मा यांची एक प्रतिकियादेखील समोर आली आहे. ‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, “ही घटना खरी नसून हा शूटिंगचाच एक भाग आहे. नानांनी कुणाला मुद्दाम मारलेलं नाही. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे ते चित्रपटातील सीनचं शूट करत होते. बनारसमधील एका मार्केटमध्ये हा सीन शूट करण्यात आला होता. यावेळी नानांना एका मुलाच्या डोक्यावर मारायला सांगितले होते आणि त्यांनी तेच केले. पण व्हायरल व्हिडीओमधील गर्दी खरी आहे. अनेकजण शूटिंगचे व्हिडीओ काढत होते. अशातच कुणीतरी नानांचा तो व्हिडीओ काढला आणि व्हायरल केला” असे म्हटले आहे. यापुढे त्यांनी “या व्हायरल व्हिडीओवरुन नानांना सोशल मीडियावर कुणीही वाईट बोलणं चुकीचं आहे” असं देखील म्हटलं आहे.
दरम्यान नानांनी दिलेल्या स्पष्टीकरणात व दिग्दर्शकाने दिलेल्या प्रतिक्रियेत तफावत असल्याचे जाणवत आहे. नाना आपल्या स्पष्टीकरणात ते चुकीने झाले असल्याचे म्हणत आहेत, तर याउलट चित्रपटाचे दिग्दर्शक तो एक शूटिंगचाच भाग असल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे नक्की कुणाचे म्हणणे खरे मानायचे? यावरून नेटकऱ्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे.