छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’. रहस्यमय कथानकामुळे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मालिकेत रोजच नवनवीन ट्विस्ट्स येत असतात. अशातच यामध्ये प्रेक्षकांसमोर नेत्राच्या तत्त्वांमागचं रहस्य उलगडणार आहे. त्याचबरोबर येत्या भागांत अग्नीतत्त्व व पंचपिटिका रहस्याचा ट्विस्टदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या मालिकेच्या चित्रीकरणचा काही भाग जंगलामध्ये शूट करण्यात येत आहे. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Shweta Mehendale Shared BTS Video On Social Media)
वावोशी गावातील स्मशानात दुसरी पेटी आहे. पण तिथे प्रेत जळत असल्यामुळे इंद्राणी व नेत्रा यांना पेटी त्या स्मशानातून बाहेर काढता येत नाही. थोडा वेळ वाट पाहून दोघी पेटी काढण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा रूपाली तिथे येते आणि इंद्राणी-नेत्राला त्याच जागी जाळून मारण्याचा प्रयत्न करते. खूप प्रयत्न केल्यानंतर दुसऱ्या पेटीचा ताबा इंद्राणी-नेत्राला मिळतो. असे आतापर्यंत मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे.
मालिकेतील इंद्राणी म्हणजेच अभिनेत्री श्वेता मेहंदळेने सोशल मीडियावर या दृश्यांचे काही क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर नेत्रा व रूपाली म्हणजेच अभिनेत्री तितिक्षा तावडे व ऐश्वर्या नारकरदेखील दिसत आहेत. मालिकेतील दृश्यांसाठी तंत्रज्ञांनी तसेच कलाकारांनी घेतलेली मेहनत या व्हिडीओमधून दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याखाली श्वेताने ‘अग्नीतत्त्व, पंचपिटिका’ असं म्हणत खाली ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील ‘पडद्यामागील दृश्य’ असंदेखील लिहिलं आहे.
दरम्यान इंद्राणी व नेत्राच्या हाती पहिल्या दोन पेट्या लागल्यामुळे रूपालीला राग येतो. यामुळे त्या दोघींच्या हाती तिसरी पेटी लागू नये यासाठी रूपाली प्रयत्न करत आहे. दरम्यान इंद्राणी व नेत्राला पंचपिटिकेतल्या दुसऱ्या पेटीमधून कोणतं रहस्य उलगडणार? की याबद्दल आणखी काही नवीन ट्विस्ट निर्माण होणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मालिकेच्या आगामी भागात या प्रश्नांची उत्तर मिळणार असून या आगामी भागांसाठी चाहतेदेखील उत्सुक आहेत.