Marathi Actor Post On Thane-Ghodbundar Accident: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात शुक्रवारी (९ जानेवारी) सकाळी झालेल्या भीषण अपघातानंतर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, वाहतुकीचा गोंधळ आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या अपघातात तब्बल १४ वाहनांची एकमेकांशी धडक झाली होती. अवजड वाहनांची वाढती वाहतूक, विरुद्ध दिशेने येणारी हलकी वाहने आणि नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.
या अपघातावर मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिल्यानंतर आता अभिनेता आस्ताद काळे यानेही या घटनेबाबत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. आस्तादने या अपघातात आपण नशिबानं वाचल्याचं सांगत, घोडबंदर रोडच्या सद्यस्थितीवर परखड शब्दांत भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे, आस्ताद काळे हे याआधीही या मार्गावरील समस्यांबाबत सातत्याने सोशल मीडियावर आवाज उठवत आले आहेत. (Marathi Actor Post On Thane-Ghodbandar Accident)
आस्ताद काळेने म्हटलं, “आता शूटिंगला येताना पाहिलेलं दृश्य… घोडबंदर रोड हा माझा रोजचा कामाला येण्याचा मार्ग आहे. काल (शुक्रवार) नशिबानं मला सुट्टी असल्यानं शुक्रवारी ‘गायमुख’ येथे झालेल्या अपघातात मी सापडलो नाही आणि नंतरच्या कोंडीत अडकलोही नाही. आज ‘ते’ वळण जवळ आलं, तसं छातीत धस्स झालं.” पुढे तो म्हणतो, “तर… कालच्या अपघातात तिथे पार चेंगरून गेलेली एक पांढरी WagonR बाजूला फुटपाथवर उचलून ठेवली आहे. त्याच वळणावर आज पुन्हा थोडी गर्दी होती. तीन चारचाकी गाड्या आणि सात-आठ दुचाकी अशी वाहने तेथे थांबली होती. त्यातली माणसं उभी होती. कशासाठी? तर त्या WagonR चे आणि तिच्याबरोबर स्वतःचे फोटो व सेल्फी काढण्यासाठी. हा आपला सिविक सेन्स आहे. फक्त सरकार किंवा यंत्रणेला दोष देऊन नाहीच चालणार.” (Marathi Actor Post On Thane-Ghodbundar Accident)
तसंच,”फार रहदारी नसतानाही आजही विरुद्ध दिशेनं वाहनं येतच होती,” असंही आस्तादने नमूद केलं आहे. घोडबंदर रोडवरील हा अपघात आणि त्यानंतर कलाकारांनी व्यक्त केलेली नाराजी पाहता, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांची जबाबदारी या सगळ्याच मुद्द्यांवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. आता प्रशासन यावर नेमकी कोणती पावलं उचलणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Marathi Actor Post On Thane-Ghodbundar Accident)




