सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातील एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’. या मालिकेला कमी कालावधीत अधिक पसंती मिळाली आहे. या मालिकेमध्ये हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता राकेश बापट पहिल्यांदाच मराठीमालिकेमध्ये काम करताना पाहायला मिळत आहे. या मालिकेमध्ये राकेशने अभिराम जहागीरदार ही भूमिका साकारली असून त्याच्याबरोबर वल्लरी विराज ही अभिनेत्री ‘लीला’च्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. या मालिकेमध्ये राकेशची भूमिका हटके असल्याने प्रेक्षक त्याच्या भूमिकेला पसंती देत आहेत. त्याची भूमिका व मराठी मालिकेतील प्रवासाबद्दल तो व्यक्त झाला आहे. (navri mile hitler la fame raqesh bapat)
राकेशने पहिल्यांदाच मराठी मालिकेमध्ये काम केले आहे. त्याच्या मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रवासाबद्दल भाष्य केले आहे. नुकतीच त्याने ‘इट्स मज्जा’ ला मुलाखत दिली त्यामध्ये त्याने आपल्या प्रवासाबद्दल माहिती दिली आहे. त्याने मालिकेच्या सेटवरील वातावरणाबद्दलही सांगितले आहे. तो म्हणाला की, “एखादा सीन शूट करताना आमच्याकडून तयारी करुन घेतली जाते. इथे प्रत्येकजण खूप सपोर्टिव्ह आहे. या मालिकेचा सेट हा खूप अलिशान आहे. हा पूर्ण सेट खूप सुंदररित्या बांधण्यात आला आहे”.
पुढे त्याने कलाकारांच्या मेहनतीवर देखील भाष्य केले आहे. तो म्हणाला की, “आम्ही मालिकेमध्ये सजतो, नटतो. आम्ही सर्वजण खूप छान दिसतो. मात्र सीन चित्रित करताना येणाऱ्या समस्या खूप असतात. सगळ्यांना वाटते की टीव्हीवरची दुनिया छान असते. मात्र ही दुनिया नक्की कशी आहे हे आम्हालाच माहीत आहे. आम्ही सेटवर एकदम आरामात राहत असू सगळ्यांना वाटते मात्र असे नसून आम्हाला आजूबाजूच्या वातावरणाचाही सामना करावा लागतो. सध्या ऊन खूप जास्त आहे आणि त्यामुळे आम्हालाही या उन्हाचा खूप त्रास सहन करावा लागतो”.
यानंतर त्याने सांगितले की, “ही मालिका करताना मला खूपच मजा येत आहे. प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मला माझ्या कुटुंबियांचे तसेच माझ्या मित्रांचे खूप फोन व मेसेज येतात. मी पुण्यात जिथे राहतो तिथे माझी मालिका सर्वजण पाहतात. संपूर्ण बिल्डिंगमध्ये एका वेळेला एक टायटल सॉंग वाजते. ही माझ्या कामाची पोचपावतीच आहे”.
दरम्यान राकेशने या मालिकेतील इतर कलाकारांचेही खूप कौतुक केले आहे. सध्या ही मालिका एका रंजक वळणावर असून लीला व अभिरामचा साखरपुडा होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. मात्र पुढे नक्की काय होणार हे आता पाहाण्यासारखे आहे.