२०२३ या वर्षात देओल कुटुंब चर्चेत असलेलं पाहायला मिळालं. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये धर्मेंद्रने महत्त्वपूर्ण काम करत प्रेक्षकांचं मन जिंकलं. तर सनी देओलच्या ‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. याशिवाय बॉबी देओलने ‘ॲनिमल’मधील अबरारच्या भूमिकेने तर अक्षरशः धुमाकूळ घातला. अशातच आता देओल कुटुंब नेटफ्लिक्सवरील कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये पाहुणे म्हणून दिसणार आहेत. या शोमधील एक ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये कपिल शर्मा व त्याची टीम सनी-बॉबीबरोबर धमाल करताना दिसत आहे. यादरम्यान सनी व बॉबी दोघेही भावूक होताना दिसले. (Deol Family emotional)
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या कार्यक्रमाच्या ट्रेलरमध्ये सनीने कुटुंबासाठी हे वर्ष किती चांगलं गेलं त्याबाबत सांगितले. तो असं बोलताना दिसत आहे की, “१९६० पासून प्रसिद्धीच्या झोतात आहेत आणि अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होतो पण मनासारख्या काही गोष्टी घडत नव्हत्या. माझ्या मुलाचं लग्न झालं, त्यानंतर ‘गदर’ आला, त्याआधी माझ्या वडिलांचा चित्रपट आला यावर विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर ‘ॲनिमल’ने येऊन बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हे ऐकून बॉबी देओल भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले.
यावेळी सनीने आपल्या वडिलांबरोबरच्या नात्याबद्दल माहिती दिली आणि सांगितले की, “माझे वडील मला त्यांच्याबरोबर बसून मित्रासारखे बोलण्यास सांगतात. मी त्यांना सांगतो की, जेव्हा मी तुमच्याशी मित्रासारखे बोलतो तेव्हा तुम्ही वडिलांसारखे वागू लागता”. यादरम्यान बॉबी देओलने गंमतीत सांगितले की, “देओल खूप रोमॅंटिक आहेत.
या शोमध्ये देओल भाऊ दोघेही खूप हसताना दिसत असल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळालं. यावेळी कृष्णा अभिषेक ‘ॲनिमल’मध्ये बॉबीच्या अबरारच्या लूकमध्ये दिसणार आहे. त्याच वेळी, प्रेक्षकांना सनी देओल व सुनील ग्रोव्हर यांच्यातील मजेदार क्षणांची झलकही पहायला मिळेल.