सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आशयघन चित्रपटांची निर्मिती होत आहे. त्यामध्ये निर्माता परेश मोकाशी हे असे चित्रपट करण्यामध्ये आघाडीवर आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा ‘नाच ग घुमा’चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 1 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या धमाल कॉमेडी ट्रेलरने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधून मध्यम वर्गीय महिलेची संसारातील तारेवरची कसरत आणि त्याला मोलकरणीची मिळणारी मदत हे विनोदी पद्धतीने मांडण्यात आले आहे. (Nach Ga Ghuma movie trailer)
‘नाच ग घुमा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून याला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळाली आहे. या ट्रेलरमध्ये मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत व बालकलाकार म्हणून मायरा वायकुळ ही कलाकार मंडळी भूमिका साकारताना दिसणार आहेत.
या ट्रेलरमध्ये चित्रपटाची कथा मुक्ता व नम्रता यांच्याभोवती फिरत आहे. मुक्ता एक घर व नोकरी सांभाळणारी महिला असून नम्रताने मोलकरणीची भूमिका साकारली आहे. यामध्ये दोघींची भांडण, एकमेकींची गरज, तसेच सारंगची विनोदी भूमिका व बालकलाकार म्हणून मायरादेखील वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. घरी मोलकरीण नसेल तर नोकरि करणाऱ्या महिलेची काय अवस्था होते हे विनोदी अंदाजात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती अभिनेता स्वप्नील जोशी, परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई व तृप्ती पाटील यांनी केली आहे. तसेच या चित्रपटाचे लेखन मधुगंधा कुलकर्णी व परेश मोकाशी यांनी केले आहे. तसेच दिग्दर्शनाची धुराही परेश मोकाशी यांनी सांभाळली आहे. दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहाण्यासारखे आहे. प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.