Majjacha Adda with Ashok Saraf : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते म्हणजे अशोक सराफ. त्यांनी आपल्या अभिनयातून गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत विविध भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचा वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. पण सध्याच्या काळात अशोक मामा मराठी सिनेसृष्टीपासून लांब असलेले पाहायला मिळाले. याबाबतचा खुलासा त्यांनी नुकत्याच ‘इट्स मज्जा’च्या खास कार्यक्रमात केला. ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात त्यांनी सध्या काम मिळत नसल्याबाबत खंत व्यक्त केली.(ashok saraf talk about why he not getting work)
मराठी सिनेसृष्टीवर अशोक मामा का दिसत नाही या प्रश्नाचं उत्तर देताना अशोक मामा म्हणाले, “आता जरा काम मिळणं कमी झालं आहे. कारण आता चांगलं काम करायला मिळत नाही. काहीतरी वेगळं करावं, लोकांना आवडेल असं काहीतरी करावं असं कोणी सध्या लिहितच नाही. आमच्यावेळीचे लेखक सगळे गेले. वसंत सबणीस, अशोक पाटोळे, दमा मिराजदार सारखे सगळे लेखक गेले. तुम्ही ही स्क्रिप्ट घ्या, तुम्ही यामध्ये काही बदल करा असं कुठेच अलिकडे घडत नाही. माझ्याकडे खूप स्क्रिप्ट्स घरात पडून आहेत. वाचतो आणि मी टाकून देतो”, असं सांगत त्यांनी सध्याच्या स्क्रिप्ट्सबाबत वक्तव्य केलं.
पुढे बोलताना अशोक मामा म्हणाले, “एखादी भूमिका साकारल्यानंतर लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. काहीतरी उगाच वाईट करुन माझ्याबद्दलचं प्रेक्षकांचं मत बदललं जाणार नाही का?. स्वतःहून सगळं कमी का करायचं? त्यापेक्षा गप्प बसायचं. मी हल्ली नाटक करतो. एक चांगलं स्क्रिप्ट माझ्याकडे आलं आहे त्याचं काम फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरु होईल. आता अलिकडे संवाद, पटकथा, कथा काहीही लिहितात. लेखक होण्यासाठी एक वेगळी समज असावी लागते”, असं सांगत त्यांनी सध्या चित्रपटांमध्ये काम करत नसल्याबाबतचा खुलासा केला.
सध्या अशोक सराफ नाटकांमध्ये रमलेले पाहायला मिळात आहेत. ‘व्हॅक्युम क्लिनर’ या नाटकात अशोक मामा मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या नाटकाचे आजवर बरेच प्रयोग झाले. तर या नाटकात त्यांच्याबरोबर अभिनेत्री निर्मिती सावंत यादेखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत.