Majjacha Adda with Ashok Saraf : अशोक सराफ व विनोद हे समीकरणचं म्हणायला हवं. उत्कृष्ट अभिनयशैली, विनोदाचं अचूक टायमिंग, हटके बोलीभाशा यांत अशोक मामांचा हात कुणीही धरू शकत नाही. कित्येक कलाकार मंडळी हे मामांच्या अभिनयापासून प्रेरित आहेत. गेली कित्येक वर्षे अशोक मामांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. विनोदवीर अशोक सराफ यांच्या विनोदाचे लाखो चाहते आहेत. मामांनी आजवर त्यांचा विनोदाचा दर्जा मात्र कायम जपला. दरम्यान आताच्या विनोदाची रूपरेषा व आधीच्या विनोदाची रुपरेषेबाबत मामांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
अशोक सराफ यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांना दादा कोंडके आता असते तर आताच्या विनोदाचा दर्जा किंवा विनोद करण्याची पद्धत वेगळी असती असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न अशोक सराफ यांना विचारण्यात आला. यावेळी आताची कॉमेडी व आधीची कॉमेडीची रूपरेषा सांगत ते म्हणाले, “मी म्हणालो तसं डबल मिनिंगच्या विनोदाचं वारं लोकांना लाागलं आहे. डबल मिनिंग हाच विनोद असं लोकांना आता वाटू लागलं आहे. पण अशापद्धतीनेच विनोद होतो असं नाही. शुद्ध विनोद असाही एक विनोद असतो. दादा कोंडके हे अफलातून कॉमेडियन होते. तो हजरजबाबी माणूस होता. कारण त्यांचं मूळ हे लोकनाट्य होतं. ‘विच्छा माझी पुरी करा’ या चित्रपटामुळे दादा कोंडके कुठल्या कुठे गेले. त्यांची स्टाइल ही लोकनाट्याची होती” असं म्हणाले.
यापुढे उदाहरण देत, “जेव्हा आम्ही ‘राम राम गंगाराम’ केलं तेव्हा मी शहरी कॉमेडियन आणि त्यांची लोकनाट्यची कॉमेडी होती. दादा कोंडकेंनी महाराष्ट्रामध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला. पण त्यांनी कमरेखालचे विनोद नाही केले. आता प्रेक्षकांचे गट पडले आहेत. विशिष्ट वयोगटातील प्रेक्षकांच्या आवडी-निवडी बदलल्या आहेत. चित्रपट, नाटकांच्या बाबतीतही तेच आहे. कलाकृती तुम्ही उत्तम सादर करता. पण समोर बसलेला प्रेक्षक काय म्हणतो यावर सगळं अवलंबून असतं. प्रेक्षक म्हणाला अरे वा… तर ठीक. पण तीन मिनिटांमध्येच त्याने पाठ फिरवली तर तुम्ही पुन्हा कुठे दिसणारही नाही”.
सध्याच्या कॉमेडीबाबत भाष्य करत ते पुढे म्हणाले, “कॉमेडी सध्या हळूहळू खाली घसरत चालली आहे. डबल मिनिंगचा विनोद करायला हरकत नाही. पण तो विनोद लांबून आला पाहिजे. थेट अशा पद्धतीचे विनोद करु नये. जेणेकरुन कोणत्याही बाईला त्याची लाज वाटेल. किंवा एखाद्या आईला तिच्या मुलाने हे काय बोलले असा प्रश्न विचारण्याची वेळ येऊ नये” असंही ते म्हणाले. एकूणच अशोक सराफ यांनी त्यांच्या आताच्या व आधीच्या विनोदाच्या दर्जाबाबत स्पष्टीकरण दिलं.