दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव महाराष्ट्रामध्ये दणक्यात साजरा करण्यात आला. गोविंदा पथकांनी थर लावत आकर्षक बक्षिसं जिंकली. दरम्यान या दहीहंडी उत्सवामध्ये मराठी कलाकारांचा सहभाग अधिकाधिक पाहायला मिळाला. काही अभिनेत्रींनी दहीहंडी उत्सवामध्ये हजेरी लावत गोविंदांशी संवाद साधला. तर काही अभिनेत्रींनी नृत्य सादर करत उपस्थितांचं मनोरंजन केलं. अभिनेत्री व नृत्यांगणा माधुरी पवारनेही दहीहंडी उत्सवामध्ये नृत्य सादर केलं.
माधुरीने दहीहंडी उत्सवामध्ये नृत्य सादर करतानाचे व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले. या व्हिडीओमध्ये ती धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. माधुरीची एनर्जी पाहून तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुक केलं. मात्र काहींनी तिचा डान्स पाहून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. दरम्यान ट्रोलर्सला अगदी सडेतोड उत्तर देत माधुरीने त्यांची बोलती बंद केली.
माधुरीच्या एका डान्स व्हिडीओवर एका महिला व्यक्तीने कमेंट केली की, “दहीहंडी उत्सवामध्ये बीभत्स नृत्य”. या कमेंटला आणखी एका युजरने रिप्लाय करत म्हटलं की, “नंगा नाच म्हणा सरळ. सध्या महाराष्ट्राचा युपी झाला आहे”. ही कमेंट वाचून माधुरीचा मात्र राग अनावर झाला. यावेळी तिने अगदी सडेतोड शब्दांमध्ये ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं.
ती म्हणाली, “बघणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये फक्त चड्ड्या दिसत आहेत. डोळे आणि कान नीट उघडे ठेऊन बघितलं तरच कळेल. नाहीतर एकाबरोबर सगळेच तुम्हाला नागडे-उघडे दिसतात. जे आहे त्याला तरी पाठिंबा देण्याची ताकद ठेवा”. माधुरीच्या या मताशी काहींनी सहमती दर्शवली आहे. तर काहींनी “गौतमी पाटीलला नावं ठेऊन स्वतःही तेच करते” म्हणत माधुरीला सुनावलं आहे.