Actor Post Against Director : मराठी मालिका आणि मालिकांमधील कलाकार नेहमीच रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून असतात. या मालिकांच्या यादीतील हे मन बावरे ही मालिका बऱ्यापैकी चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. या मालिकेने आणि मालिकेच्या कथानकाने रसिकांच्या मनात घर केलं. अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि शशांक केतकर यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. मालिका प्रचंड गाजली पण नंतर ती संपताच काही काळाने त्याबाबतचे वाद देखील समोर आले. मालिकेत काम केल्यानंतर योग्य ते मानधन मिळालं नसल्याच्या तक्रारी कलाकार आणि इतर टीम कडून करण्यात आल्या. दिग्दर्शक, निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. सुरुवातीला अभिनेता शशांक केतकरने याविरोधात आवाज उठवला होता. मग हळू हळू आणखी काही कलाकार यावर आवाज उठवताना दिसले. अशातच आता अभिनेते विजय पटवर्धन यांनीदेखील आवाज उठविला आहे.
थेट त्यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “सुखाच्या सरींनी. हे मन बावरे. ही लोकप्रिय मालिका बंद होऊन, आता जवळपास पाच ते सहा वर्ष झाली. पण, माझ्या कामाचे पैसे अजूनही मिळाले नाही आहेत. इतकी वर्ष वाट पाहून आता नाईलाजाने मला व्यक्त व्हावे लागत आहे. मी मंदार देवस्थळी, यांच्या टीम वर्क अल्ट्रा क्रिएशन निर्मित ‘हे मन बावरे’ या मालिकेमध्ये नायिकेच्या म्हणजेच मृणाल दुसानीस हिच्या भावाची ‘सुनीलची’ भूमिका केली. चित्रीकरणाच्या दरम्यान वेळ काळ न बघता, प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जीव तोडून काम केले. पुण्यात असताना तातडीने शुटिंगला बोलावल्यावर लगेच मुंबईला गेलो आहे. कोविड काळातही बंधने शिथिल झाल्यावर मालिकेत काम केलं. मालिका संपल्यानंतर या मालिकेचा एक पैसाही मला मिळालेला नाही”.
आणखी वाचा – दिवसा शूट, रात्री कॉर्पोरेट जॉब अन्…; ‘ठरलं तर मग’मधील अर्जुन करतो दोन नोकऱ्या, जगतोय असं आयुष्य

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “पॅकअपच्या वेळेला मला काही रकमेचा जळपास तीन लाखाचा चेक देण्यात आला होता. पण तो भरल्यावर बाऊन्स झाला. त्या बद्दल विचारणा केली तेव्हा एका आठवड्यात फोन करतो असं सांगण्यात आलं. पण आजतागायत फोन आला नाही. एक उत्तम दिग्दर्शक आणि मित्र असल्यामुळे माझ्यासकट बऱ्याच जणांनी काही कंप्लेंट केली नाही किंवा कुठेही वाच्यता केली नाही. पण आता पाणी डोक्यावरुन जायला लागल्याने हे लिहावे लागले. बायकोच्या कॅन्सर ट्रीटमेंटसाठी पैसे हवे होते त्यासाठी फोन केला, तो पण उचलण्यात आला नाही. काही कलाकारांना त्यांचे पेमेंट मिळाले पण काहींना नाही मिळाले. अनेक वेळेला फोन केला पण उचलला गेला नाही. प्रत्यक्ष भेट झाल्यावरही काही विषयही काढला गेला नाही. आम्ही प्रत्येक वेळी समजून घेतलं, नेहमीच सपोर्ट केला. पण आम्हाला फक्त तारखा आणि आश्वासनं मिळत गेली. मंदार खूप उत्तम दिग्दर्शक आहे. त्याच्याबद्दल नेहमीच आदर आणि प्रेम आहे आणि राहीलही. म्हणूनच इतके दिवस गप्पं होतो. पण आता त्याच गोष्टींचा विचार करुन खूप मानसिक त्रास होतोय. मंदार, हे सगळं इथे शेअर करतोय, कारण इतके दिवस मी तुझ्या अडचणी समजून घेतल्या. पण, आता माझ्याही काही अडचणी आहेत. ज्यातून मार्ग काढणं अवघड जातं आहे. माझ्या अडचणी तू समजून घ्याव्या. एकदा माझ्या बाजूनेही विचार कर. मला कुणालाही दोष द्यायचा नाहीये. पण इतकी वर्ष वाट पाहूनही न्याय/पैसे न मिळणं कोणासाठीही खूप त्रासदायक आहे. आणि या सगळ्यांत माझं काय चुकलं?”.
शेवटी त्यांनी असंही म्हटलं आहे की, “तू ज्या अडचणीत आहेस अशी वेळ कुणावरही कधीच येऊ नये. लवकरच तू याच्यातून बाहेर पडावस. माझ्यासारखे अनेक लोकांचे पैसे अडकले आहेत, ते लवकर मिळावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. मंदार, तू लवकर या सगळ्यांतून बाहेर पडावं आणि पुन्हा पहिल्यासारखं जोमाने आणि जबरदस्त काम करावं हिच सदिच्छा. धन्यवाद. (तुझ्याबद्दलचा आदर म्हणून इतके दिवस कधी बोललो नाही. पण, आज मला व्यक्तं व्हावंसं वाटलं . चूकभूल माफ. मला लाईक्स आणि सहानुभूती मिळावी म्हणून मी हे लिहिलं नाही आहे. ज्यांना असा अनुभव आला आहे, त्यांना माझं म्हणणं आणि माझी अडचण कळेल)”.





