Amit Bhanushali Exclusive Interview : ‘ठरलं तर मग’ या मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गेली अनेक वर्ष ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळाली आहे. या मालिकेमुळे अर्जुन-सायली म्हणजेच अमित भानुशाली आणि जुई गडकरी ही जोडी घराघरांत पोहोचली. या जोडीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. जुईने आजवर अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र अमितला या मलिकेने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. अमितच्या मालिकेतील भूमिकेवर प्रेक्षक प्रचंड खुश आहेत. सोशल मीडियावरही अमित बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.
अशातच ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अमितबाबत आणखी एका मोठी बातमी समोर आली आहे. कलाकारांचा जोडधंदा असणं याबाबत दुमत नाहीच. आजकाल अनेक कलाकार मंडळी व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अमितही अभिनयाबरोबर कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असल्याचं समोर आलं आहे. अभिनय या त्याच्या कलेबरोबर तो त्याची एडिटिंगची आवडही जोपासत आहे. याबाबत अमितने ‘इट्स मज्जा मराठी’ या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – Tharala Tar Mag : प्रिया-साक्षीला अटक होणार का?, विलास खुनाची केस अर्जुन जिंकणार का?, मोठा ट्विस्ट समोर
अमित त्याच्या कामाबाबत बोलताना म्हणाला, “प्रॉब्लेम असा आहे की, दिवसांत २४ तास आहेत. आणि अजून जास्त तास असते तर अजून काम करता आलं असतं. यापैकी मी फक्त चार तास झोपतो, जास्तीत जास्त पाच तास. त्याहून जास्त मी झोपत नाही आणि मला झोप लागत नाही. माझं रोजचं रुटीन सकाळी सुरु होतं. वर्कआऊट वगैरे झाल्यानंतर शूटिंगसाठी निघतो. याव्यतिरिक्त मी ऍनिमेशनही करतो. मी एडिटिंग करतो. मी कॉर्पोरेटसाठी ऍड, जिंगल्स बनवायचंही काम करतो. ते मी एडिट करतो. त्यांचे रोजचे व्हिडीओ त्यांना एडिट करुन हवे असतात ते मी करतो. कधी ऍनिमेशन कधी २डी ऍनिमेशन असतात”.
पुढे तो म्हणाला, “माझा स्वतःचा सेटअप आहे. लॅपटॉप तर नेहमी माझ्याबरोबर असतो. शुटिंगदरम्यान जेव्हा केव्हा सीन नसतात तेव्हा मी माझं काम करतो. जबाबदाऱ्या वाढत गेल्या की सगळी काम अगदी वेळेत होतात. जेव्हा मला एडिटिंगचं वगैरे जास्त काम असतं तेव्हा मी फक्त दोन तास झोपतो. इथून शूट संपवून घरी जाऊन मी जवळपास चार-पाच तास काम करतो”.





