आपल्या विनोदाच्या अनोख्या बाजाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडणाऱ्या काही कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेते मकरंद अनासपुरे. मकरंद यांनी आतापर्यंत अनेक विनोदी भूमिका केल्या आहेत. त्यांच्या संवाद फेकण्याच्या व विनोद करण्याच्या अनोख्या शैलीने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यांनी आजवर अनेक विनोदी भूमिका केल्या असल्या, तरी गंभीर भूमिका करण्यातदेखील त्यांचा तितकाच चांगलाच हातखंड आहे. अशातच त्यांच्या नवीन चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
मकरंद यांच्या आगामी ‘ओवा’ या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू असून या चित्रपटाचे शूटिंग हे कोकणात होणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘हापूस’ या चित्रपटानंतर ते पुन्हा एकदा कोकणात चित्रपट शूट करण्यासाठी गेले आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वृत्तानुसार कोकणातील ओरी या ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे. स्वकेंद्री व हेकेखोर स्वभावाचा एक निवृत्त अधिकाऱ्याला अनेक वर्षं सहन केल्यावर एकेदिवशी त्याच्या पत्नीचा अचानक झालेला उद्रेक असा या चित्रपटाचा आशय असल्याचे म्हटले जात आहे.
या चित्रपटात मकरंद यांच्याबरोबर अभिनेत्री मिताली जगताप ही मुख्य भूमिकेत आहेत. श्रीकांत बोजेवार यांनी कथा, पटकथा व संवाद लिहिले आहेत. अरविंद सागोळे यांनी संगीत दिलं आहे. तर ‘पेन्शन’ व ‘फेक मॅरेज’ हे चित्रपट करणाऱ्या सॅवी गोयल यांनी ‘ओवा’ या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केलं आहे. मकरंद यांच्या या नव्या चित्रपटाचं शीर्षक तर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारं आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील त्यांची नेमकी भूमिका काय असणार याचीदेखील प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
आणखी वाचा – अशी आहे शुभंकर-अमृताची लव्हस्टोरी! अभिनेता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला, “कुछ बाते बस हो जाती है…”
दरम्यान, ‘दे धक्का २’ नंतर बरेच दिवस ते मोठ्या पडद्यावर दिसले नव्हते. मध्यंतरी ते सोनी मराठी वाहिनीवरील ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. अशातच आता त्यांच्या आगामी ‘ओवा’ या नवीन चित्रपटासाठी व या चित्रपटातील त्यांच्या अनोख्या भूमिकेसाठी चाहते कमालीचे उत्सुक झाले आहेत.