सध्या सर्वत्र लग्नसराई सुरू आहे. गेल्या काही दिवसांत हिंदीसह मराठतील अनेक कलाकार आपल्या जीवनसाथी बरोबर विवाहबंधनात अडकले आहेत. ‘बिग बॉस’ फेम प्रसाद-अमृता हेदेखील नुकतेच विवाहबद्ध झाले. अशातच छोट्या पडद्यावरील ऑनस्क्रीन जोडी अभिनेत्री अमृता बने व अभिनेता शुभंकर एकबोटे हेदेखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकताच त्यांचा साखरपुडा झाला. यानंतर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. (Shubhnakar Ekbote On Instagram)
अशातच त्यांच्याबद्दलची आणखी एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. शुभंकरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली असून या पोस्टद्वारे त्याने त्याची लव्हस्टोरी सांगितली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “कन्यादान मालिकेसाठी लूकटेस्ट होती आणि त्यासाठी एक सुंदर मुंबईची मुलगी माझ्या पत्नीच्या भूमिकेत काम करणार आहे, म्हणून भूमिकेतील काही फोटो व लूकच्या दृष्टीने ‘तिला नवरा म्हणून मिठीत घे आणि होल्ड करा’ असे दिग्दर्शकाने सांगितले. त्या क्षणी आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं. ती एक प्रोफेशनल गोष्ट असली तरीही कुठेतरी दोघांच्याच नजरेतून पटकन एक चमक येऊन गेली. ही चमक अवघडलेपणाची होती की, येणाऱ्या काळाचा इशारा देणारी होती. हे मात्र त्या क्षणी लक्षात आलं नाही. सीन किंवा शूटिंगसाठी मारेलली मिठी खरं तर माझ्यासाठी काहीशी अवघडल्या सारखी होती आणि अशा तर्हेने आम्हा दोघांची अवघडलेली, आनंदी, फ्रेश व खरा प्रवास सुरु झाला.”
यापुढे त्याने म्हटलं आहे की, “मग या प्रवासात कामानिमित्त रोजच्या रोज भेटी, वेगवेगळ्या भावनांचे सीन आणि त्याबद्दल होणारा संवाद हे सगळं सुरु झालं. हा प्रवास एक-एक स्टेशन घेत सुमारे १ वर्ष ९ महिने चालू होता. मला शूटिंगमध्ये एका दिवसाची सुट्टी मिळाली तरी माझ्या मूळ गावाकडे म्हणजेच माझ्या पुण्याकडे पळणारा मी, अरे धावपळ का करतोस? असा माझ्या बाबाचा ओरडा खाणारा मी, २-३ दिवस सलग सुट्टी मिळूनही मुंबईतच थांबायला लागलो! हे का झाले? तर ‘कुछ बाते बस हो जाती है, और शायद इसे ही प्यार कहते हैं!’ हे माझ्या लक्षात आले.”
“घाईघाईत पुण्याला येऊ नकोस” असं म्हणणारा माझा बाबा “अरे २ दिवस सुट्टी मिळूनसुद्धा का नाही येतेस तू?” असं म्हणायला लागला. माझं मन कधी माझ्या कल्पनेच्या कॅनव्हासवर नसलेलं चित्र नकळतपणे रंगवायला लागलं आणि त्यात रंग भरू लागलं हे माझं मलाच समजलं नाही. मग हळूहळू खऱ्या मैत्रीला सुरुवात झाली. त्यात कामाव्यतिरिक्त भेटी, कोणत्याही विषयावर अवांतर चर्चा, रात्री उशिरापर्यंत घराजवळ कट्ट्यावर बसणे, मुंबईतल्या वेगवेगळ्या स्पेशल जागांवर फिरणं, खूप व्हरायटीची खवय्येगिरी, नाटक, सिनेमा, कविता, गाणी, शाहरुख खानवर असलेलं अमर्याद प्रेम, मराठा मंदिर मध्ये जाऊन दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगेचा शो एकत्र बघणं, कॅडबरी क्रकर्स , लिटिल हार्टस्, मरिन ड्राइव्ह , पुण्याची सफर, कुलाबा कोझवे, क्रॉफर्ड मार्केट आणि बरंच काही. हळू हळू मुंबईची लोकल ट्रेन जशी ट्रॅक हळुवारपणे बदलते, तसंच रील प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.”
दरम्यान, शुभंकर व अमृता ही जोडी कन्यादान या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ऑनस्क्रीन लोकप्रिय असणारी ही जोडी आता खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यातदेखील एकत्र आली आहे. दरम्यान आता ही जोडी लग्न कधींकरणार याविषयी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.