Majjacha Adda with Ashok Saraf : आपल्या अभिनयातून सगळ्यांचं मनं जिंकणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. मराठी चित्रपट, नाटकांसह त्यांनी हिंदीमध्येही स्वतःची छाप पाडली. त्यांनी आजवर बऱ्याच विविधांगी भूमिका केल्या. त्यातील मालिका विश्वातील एक हिंदी मालिका म्हणजे ‘हम पांच’. या मालिकेतील निखळ विनोदाने सगळ्यांना खळखळून हसवलं. या मालिकेत अशोक मामा पाच मुलींच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले होते. नुकतंच त्यांनी ‘इट्स मज्जा’च्या खास कार्यक्रम ‘मज्जा अड्डा’मध्ये त्यांच्या या मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी मालिकेतील पत्नीच्या फोटोबरोबरच्या संभाषणाच्या सीनबाबतही सांगितलं. (ashok saraf share experience of his hum paanch hindi serial)
अशोक मामा ‘हम पांच’ मालिकेबाबत बोलताना म्हणाले, “‘हम पांच’सारखी मालिका ट्रेंन्ड सेट ठरली. अगदी लहानांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत ती मालिका सगळे बघायचे. त्यात पूर्णपणे निखळ विनोदी होते. कोणतीही फालतुगिरी त्यात नव्हती. त्या पाच मुलींमध्ये जो हैराण बाप दाखवायचा होता तो बाप मालिकेत दिसला आणि त्यातूनच विनोद निघाले. लेखक पण खूप चांगला होता. त्याने एक वाक्य दिलं असलं तरी दुसरं वाक्य माझं असायचं. मालिकेत फोटोतील बायकोबरोबर संभाषण हा त्या काळातील खूप वेगळा प्रकार होता. कोणीही ही संकल्पना आजवर केली नव्हती. ही संकल्पना त्याची आहे”.
अशोक मामा पुढे म्हणाले, “लेखकाने एवढंच लिहीलं होतं की फोटोतील बाई बोलते आणि तिचा नवरा फक्त तिच्याकडे बघतो. पण तिच्याबरोबर संभाषण ही संकल्पना पूर्णपणे माझी होती. मी साकारलेलं पात्र काही बोलले हा प्रकार ठरलेला नव्हता. पण मग तो प्रकार मी सुरु केला. पुढे मग ते त्याप्रमाणे लिहिले गेलं. त्यामुळे मालिकेत आमच्या दोघांची डायलॉगबाजी प्रेक्षकांना पाहायला मिळाली”, असं सांगत त्यांनी हम पाच मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला.
‘हम पाच’ मालिकेने त्या काळात सगळ्यांची मनं जिंकली. मालिकेतील विनोदी अंदाज आणि पात्रांच्या खेळीमेळीचा अंदाज सगळ्यांनाच आवडला. अशोक मामांनी साकारलेलं आनंद माथुर हे पात्र चांगलंच गाजलं. त्यांच्या ५ मुलींच्या करामती, त्यांचं त्यांच्या पहिल्या पत्नीबरोबर फोटोंशी बोलणं हे सगळं प्रेक्षकांना बरंच आवडलं. या मालिकेचे दोन भाग आले पण या दोन्ही भागांमधून मालिकेनं प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं.