Majjacha Adda with Ashok Saraf : मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचे सम्राट म्हणून ख्याती असलेले अभिनेते म्हणजे अशोक सराफ. त्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या विनोदी व्यक्तीरेखा आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. अशोक मामा आणखी एका गोष्टीसाठी बरेच लोकप्रिय आहेत. ती गोष्ट म्हणजे त्यांचा साधा पेहराव. नुकताच अशोक मामांनी ते साधा पेहराव का परिधान करताना याचा खुलासा ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या खास कार्यक्रमात केला. (Why ashok saraf seen in simple clothes)
अशोक मामांना आपण नेहमी साध्या लूकमध्ये पाहतो. पूरस्कार सोहळ्यांमध्येही कालाकर अगदी चांगल्या लूकमध्ये पाहायला मिळतात. पण मामा मात्र साध्या अंदाजात पाहायला मिळतात. त्यांचा अंदाज हा अगदी साधा पॅन्ट टि-शर्ट, शर्ट यामध्ये पाहायला मिळतो. यावर उत्तर देताना अशोक मामा सांगतात, “माझा पेहराव अगदी साधा असतो. चांगले कपडे असावेत, मुळात कपडे असावेत इथपर्यंत असतो. कपडे ही दुय्यम बाब झाली. माणूस हा माणूस नेमका काय आहे हे पहिलं ठरतं”.
अशोक मामा पुढे म्हणाले, “तु जर खूप छान बोलत असशील तर मग मी तु काय कपडे घातले आहेत याचा विचार करणार नाही. कपडे ही दुय्यम संकल्पना आहे तुमचं कर्तुत्व महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी कधीही कपड्यांना महत्त्व दिलेलं नाही.माझे कपडे पाहिलात तर मी एका टी-शर्ट व पॅन्टवर असतो. मी कधी सूट-बूटमध्ये नसतो. फारच कधी मोठे प्रोग्राम असेल तेव्हा मला तसं जावं लागतं”, असं सांगत त्यांनी आपल्या पेहरावाबाबत खुलासा केला.
इतर कलाकारांची उदाहरणं सांगत अशोक मामा म्हणाले, “बरेच कलाकार असे आहेत जे पेहरावाचा थाट करत नाहीत. नाना पाटेकर कुठेही जाताना ते सदरा व लेहेंग्यामध्ये दिसतात. विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर हे नेहमी साध्या पेहरावात असतात. कोण त्यांच्याकडे त्यांनी काय घातलं हे बघत नाही. त्यांच्या कर्तुत्वामुळे कपडे ही गोष्ट दुय्यम ठरते. त्यामुळे ती गोष्ट दुय्यम बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मी कपड्याला महत्त्व देत नाही”. असं सांगत त्यांनी ते साध्या कपड्यात का दिसतात याचं कारण स्पष्ट केलं.