‘अस्मिता’ या मालिकेमुळे अभिनेत्री मयुरी वाघ घराघरांत लोकप्रिय झाली. यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. तिने नुकतंच तिच्या स्वप्नातील नवीन घर खरेदी केलं असून गृहप्रवेश व वास्तुशांती पुजेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. “माझ्या स्वप्नांच्या यादीमधील आणखी एक गोष्ट मी पूर्ण करून दाखवली. माझं स्वप्न मी घराच्या रुपात साकार केलं” असं म्हणत तिने हे फोटो शेअर केले. दरम्यान तिच्या या आनंदाच्या बातमीवर तिच्या चाहत्यांसह मराठीतील अनेक कलाकारांनी कमेंट्सद्वारे तिचे अभिनंदन केले. (Manjiri Oak On Instagram)
मयुरीच्या नवीन घरानिमित्त तिला शुभेच्छा देणाऱ्या अनेक मॅसेजेस् व कमेंट्स चाहत्यांकडून करण्यात आले. अनेक मराठी न्यूज वेबपोर्टल्सकडूनही अभिनेत्रीचे कौतुक करण्यात आले. पण काही मराठी न्यूज वेबपोर्टलनी मयुरीच्या नवीन घराच्या बातमीला दिलेल्या हेडिंग्सवरुन आता नवीन विषयाला तोंड फुटले आहे. तिच्या नवीन घराची बातमी देताना काही वेबपोर्टल्सनी तिच्या आधीच्या लग्नावरुन तिला डिवचले आहे. दरम्यान, या सगळ्यात स्वतः मयुरीने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या सगळ्याचा मंजिरी ओक यांना चांगलाच संताप झाला आहे आणि तिच्या सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर करत तिने हा संताप व्यक्त केला आहे.
मंजिरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने मयुरीच्या घरासंदर्भात बातम्या केलेल्या न्यूजपोर्टलचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंखाली कॅप्शनमध्ये मंजिरीने असं लिहिलं आहे की, “एखादी मुलगी तिच्या आयुष्यात मेहनत करुन उभी राहते. नवीन घर घेते. तिचं कौतुक करायचं नसेल तर नका करु. पण बातमी देण्याची ही कुठली पद्धत आहे? म्हणजे एकीकडे ‘आपली’ अभिनेत्री म्हणायचं आणि ‘आपल्याच’ लोकांनी तिची अशी चेष्टा करायची का? हे छापताना आपण कोणाच्या तरी आनंदावर विरजण घालत असू किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबियांच्या दुःखाचं कारण होत असू? हा विचार एकदाही येत नसेल का? ‘अमुक अमुक व्यक्तीनी घर घेतलं’ इतक्या साध्या बातमीचा उगाच इतर गोष्टींबरोबर संबंध का लावायचा? की फक्त बातम्या वाचण्यासाठी काहीही हेडिंग्ज द्यायच्या? या आधीही अनेकदा असे प्रकार झाले आहेत. पण का कोणास ठाऊक आज व्यक्त व्हावंसं वाटलं.”
दरम्यान, तिच्या या पोस्टला अनेक कलाकारांनी समर्थन दिले आहे. अभिनेत्री पल्लवी पाटील, हेमांगी कवी, शर्मिष्ठा राऊत, नयना मुकये यांनी मंजिरीच्या पोस्टखाली कमेंट्स करत तिला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर अनेक नेटकऱ्यांनीही मंजिरीच्या या पोस्टला कमेंट करत पाठिंबा दिला आहे. अगदी खरं आहे, छान बोललीस, किती विचित्र बातमी आहे, तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत. एकदम बरोबर बोललात” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी मंजिरीला पाठिंबा दिला आहे.