छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमांपैकी एक आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे जगभरात लाखो चाहते दिवाने आहेत. या कार्क्रमाच्या विनोदी बाजूने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याशिवाय या शोमधील कलाकारांच्या अभिनयाचेही लाखो चाहते दिवाने आहेत. हास्यजत्रेतील कलाकारांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आजवर या कलाकारांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. मात्र या विनोदी शैलीचे खरे बादशाह हे या कार्यक्रमाचे लेखक-दिग्दर्शक आहेत. सचिन मोटे व सचिन गोस्वामी यांचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. (Mhj Artist New Movie)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांची हवा आता संपूर्ण देशभर पसरली आहे, असं म्हणायला हरकत नाही. या विनोदी कार्यक्रमानंतर आता लेखक सचिन मोटे व दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी ‘गुलकंद’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या गोष्टींची सुरवात केली जाते. आणि अशातच हास्यवीरांनीही गुढीपाडव्याचं औचित्य साधून त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
अभिनेता समीर चौघुले, प्रसाद ओक यांनी ‘गुलकंद’ या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे शेअर केलं आहे. या पोस्टरवर सुंदर असा गुढीचा फोटो, गुलाबाच्या पाकळ्या आणि मागे आलिशान घर दाखवण्यात आलं आहे. या पोस्टवर कॅप्शन देत, “नवंवर्षात वाढवू या प्रेमाचा गोडवा, आपल्या कुटुंबाबरोबर पाहूया सिनेमा नवा”, असं हटके कॅप्शन दिलेलं पाहायला मिळत आहे.
चित्रपटाच्या पोस्टरवरुन हा चित्रपटाचे कथानक कुटुंबाभोवती फिरणार असल्याचं दिसत आहे. ‘गुलकंद’ या चित्रपटात प्रसाद ओक, इशा डे, समीर चौघुले, सई ताम्हणकर ही कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. या कलाकारांसह आणखी कोणते कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. त्याचबरोबर सिनेमाची गोष्ट नेमकी काय असणार याची उत्सुकताही प्रेक्षकांना लागून राहिली आहे. हास्यजत्रेचे हास्यवीर आता छोट्या पडदा गाजवल्यानंतर मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाले आहेत.