बोल्ड व बिनधास्त व्यक्तिमत्त्वाने अभिनेत्री सई ताम्हणकरने आजवर सिनेसृष्टीतील तिचे स्थान टिकवून ठेवले आहे. सिनेसृष्टीत कोणताही वारसा नसताना केवळ कलेच्या जोरावर सईने चित्रपट सृष्टीत आपली जागा निर्माण केली आहे. सईने चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. लोकप्रिय आणि चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सईचं नाव आवर्जून घेतलं जातं. मराठी सिनेसृष्टीत आपलं नाव कमावल्यानंतर सईने हिंदी सिनेविश्वातही आपला दबदबा निर्माण केला. (Saie Tamhankar New Car)
सईने केवळ अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर नामांकित अभिनेत्रींच्या यादीत नाव मिळवलं. चित्रपटांमध्ये काम करता करता सई ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम पाहत आहे. सोशल मीडियावरही सई बऱ्यापैकी सक्रीय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच गेल्या वर्षी सईने मुंबई तिचं स्वतःचं हक्काचं नवं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली होती. घराचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आता सईचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं आहे.
सईने नवीकोरी महागडी आणि आलिशान गाडी खरेदी केली आहे. गुढीपाडव्याचं औचित्य साधत सईने ही नवीकोरी गाडी विकत घेतली असून ही आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह शेअर केली आहे. सईने नवी गाडी खरेदी केल्यानंतरचा एक सुंदर असा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावरुन पोस्ट केला आहे. यावेळी तिने तिच्या टीमचे तसेच आजूबाजूला कायम असणाऱ्या लोकांचे आभार व्यक्त केले आहेत कारण आज त्यांच्यामुळे गाडी घेण्याचे सईचं स्वप्न पूर्ण झालं आहे. असं तिने म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये गाडी घेतल्यानंतर सई तिच्या आईला घट्ट अशी मिठी मारतानाही दिसत आहे. लेकीचं यश पाहून आईचा आनंद गगनात मावेनासा झालेला पाहायला मिळाला.
“तुम्ही काय करु शकता किंवा काय करु शकत नाही हे कोणालाही सांगत बसू नका. स्वप्न पहा, ते साध्य करा, आणि जगा. जसे आपण नवीन वर्ष सुरु करतो. चला नवीन ध्येय सेट करुया आणि एकत्रितपणे ते साध्य करुया”, असं कॅप्शन देत तिने नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. आलिशान गाडीबरोबरच्या सईच्या या खास पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी तसेच अनेक कलाकार मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.