गुढीपाडव्याचं औचित्य साधत सिनेसृष्टीत अनेक कलाकारांनी चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. काही कलाकार जोड्यांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. तर काहींनी नवीकोरी कार खरेदी केली असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली. सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर हिनेदेखील गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवी गाडी खरेदी केल्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली. या पाठोपाठ आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने महागडी कार खरेदी केली असल्याचं समोर आलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. (Prajakta Gaikwad New Car)
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आलिशान व महागडी कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावरुन तिने याबाबतची माहिती चाहत्यांसह शेअर केली. प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. प्राजक्ताने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईंची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे प्राजक्ता घराघरात पोहोचली. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
“जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा”, असं कॅप्शन देत प्राजक्ताने तिच्या सुंदर अशा गाडीबरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ताचा खास लूकही लक्षवेधी ठरला. यावेळी प्राजक्ताचा पारंपरिक अंदाज विशेष भावला. प्राजक्ताने पैठणीपासून बनवलेला खास ड्रेस परिधान केला होता. प्राजक्ताच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ता बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. प्राजक्ता बरेचदा तिच्या हटके व पारंपरिक फोटोशूटमुळे चर्चेत असते. सध्या प्राजक्ता मालिकाविश्वात सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. अभिनयातून वेळात वेळ काढत तिने शिक्षणाची गोडी जपली. गेल्यावर्षी प्राजक्ताने अभिनय करता करता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या परीक्षेत फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळवलं.