प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ८ डिसेंबरला (शुक्रवार) हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये दाखल होईल. त्याचपूर्वी सोमवारी (४ डिसेंबर) चित्रपटाचा प्रिमियर सोहळा पार पडला. या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान नम्रता संभेराव चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. नम्रतासह तिचे कुटुंबियही या सोहळ्याला उपस्थित होते. शिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारही प्रसादला शुभेच्छा देण्यासाठी आले. यावेळी प्रसादचं यश पाहून गौरवला अश्रू अनावर झाले. (Guarav More And Prasad Khandekar Interview)
‘इट्स मज्जा’शी संवाद साधताना गौरव भावुक झाला. प्रसादचा पहिलाच दिग्दर्शनाचा चित्रपट प्रदर्शित होत आहे म्हटल्यावर गौरवरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तो म्हणाला, “प्रसादबरोबर आमचं एक वेगळंच नातं आहे. आमचा ग्रुपच वेगळा आहे. तो आमचा कॅप्टन आहे. विनोदी गोष्ट असो किंवा गंभीर विषय त्याला प्रत्येक गोष्टी चांगल्या सुचतात. चित्रपटाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मीही होतो. प्रत्येक काम झालं की, प्रसाद मला दाखवायचा. तेव्हा मी त्याला म्हणायचो आता काय दाखवू नको मला थेट चित्रपटच बघायचा आहे. आज प्रसादचा दिवस आहे.”
पुढे गौरव म्हणाला, “प्रसादची नवी इनिंग सुरु झालेली आहे. दिग्दर्शक म्हणून काम करणं किती कठीण आहे हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. मलाही सगळे विचारतात तू या चित्रपटामध्ये का नाही? कोणतंही काम असलं की, प्रसाद मला आधी विचारतो की तू करणार का काम?. पण या चित्रपटाच्यादरम्यान मी ‘लंडन मिसळ’ चित्रपट करत होतो. लंडनमध्ये शूट सुरु होतं. माझेच सगळे मित्र-मंडळी काम करत आहेत. प्रसादला माझ्या आयुष्यभर शुभेच्छा आहेत.”
प्रसादने यावेळी गौवरचं तोंडभरुन कौतुक केलं. प्रसाद व गौरवरने बरीच वर्ष एकत्र काम केलं आहे. याचबाबत प्रसाद म्हणाला, “आपल्या संपूर्ण प्रवासात आपलं मन, शरीर आपल्या बरोबर असतं. तसंच गौरव मोरे माझ्या संपूर्ण प्रवासाचा साथीदार आहे. माझ्या अगदी शून्यापासून आतापर्यंत सगळ्या गोष्टी गौरवला माहित आहेत”. प्रसादचं ह बोलणं ऐकून गौरवला अश्रू अनावर झाले. तो रडत असताना प्रसादने त्याला मिठी मारत त्याचे आभारही मानले.