हिंदी सिनेसृष्टीत ज्युनिअर महमूद या नावाने लोकप्रिय असलेले अभिनेते गेले काही दिवस एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. ९० च्या दशकापर्यंत आपल्या अभिनयाने हिंदी सिनेविश्व गाजवलेले अभिनेते सध्या पोटाच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. अभिनेते जॉनी लिवर हे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेले होते. त्यानंतर महमूद यांच्या आजाराचे वृत्त समोर आले आहे. जॉनी लीवर यांच्यानंतर मास्टर राजूदेखील त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. पण ज्युनिअर महमूद यांना त्यांचा बालपणीचा मित्र सचिन पिळगावकर व जितेंद्र यांना भेटायचे आहे. ज्युनियर महमूदचा जवळचा मित्र सलाम काझी यांनी ‘ई टाइम्स’ला याबाबतचे वृत्त दिले आहे. (Junior Mehmood Suffering From Cancer)
ज्युनिअर महमूद यांनी जितेंद्र यांच्याबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. गेल्या १५ वर्षांपासून सलाम काझी हे ज्युनिअर महमूद यांच्याबरोबर आहेत. याबद्दल त्यांनी असे सांगितले की, “ज्युनियर महमूद यांना जितेंद्र व सचिन यांची खूप आठवण येत आहे आणि त्यांनी सचिन यांना यासंदर्भात मॅसेजही केला आहे. पण सचिन यांनी त्याला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. तसेच सचिन यांनी महमूद यांना व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क केला असला तरी अद्याप ते त्यांना भेटायला आलेले नाहीत.”
महमूद हे गेल्या दोन महिन्यांपासून आजारी असल्याचे सलाम काझी यांनी सांगितले. सुरुवातीला त्यांना हा किरकोळ आजार वाटला. पण अचानक त्याचं वजन कमी होऊ लागलं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे रिपोर्टस आले तेव्हा त्यांना फुफ्फुस व यकृतमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले. त्यांना याआधी कावीळचादेखील त्रास झाला होता. त्यांच्यावर सध्या घरीच उपचार चालू आहेत. पण त्यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजवर पोहोचला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
जॉनी लीवर हे गेले अनेक दिवस महमूद यांच्या संपर्कात होते. पण त्यांनी कधीही त्यांच्या तब्येतीबाबत सांगितले नाही. अशातच महमूद यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यांच्याकडे फक्त ४० दिवस शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे. या अभिनेत्याचं सिनेसृष्टीतील योगदान हे मोठं आहे. देवानंद, राजेश खन्ना, संजय दत्त अशा अनेक सुपरस्टार्सबरोबर महमूद यांनी काम केलं आहे. ५० वर्षांच्या त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी २५० हून अधिक सिनेमांत काम केलं आहे.