कुटुंबव्यवस्था हा आजही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि लग्न हा या कुटुंबव्यवस्थेचा कणा. म्हणूनच आजच्या वेगवान जगाशी जुळवून घेताना आजची तरुण पिढी लग्नव्यवस्थेबद्दल खूपच विचारपूर्वक निर्णय घेताना दिसून येते. आजची तरुण पिढी ही त्यांच्या वैयक्तिक किंवा वैवाहीक आयुष्याबाबतचे निर्णय हे त्यांच्या करिअरच्या दृष्टीने घेतात.
प्रत्येकाचं लग्न झालंच पाहिजे, ते वेळच्या वेळी झालं पाहिजे आणि ते यशस्वीही झालं पाहिजे, हा एकमेव समज बाळगत याआधीच्या पिढय़ा जगल्या. पण, आताच्या पिढीबाबत हळूहळू चित्र पालटताना दिसत आहे. नव्या पिढीत लग्न जुळण्याच्या, जुळवण्याच्या, करण्याच्या किंवा त्या निभावण्याच्या पद्धती हळूहळू बदलत आहेत. पण लग्न करण्याच्या आधी काय केले पाहिजे. याबद्दल विशाल तरटे यांनी मार्गदर्शन केले आहे. विशाल हे ज्योतिष असून त्यांनी लग्न करण्याच्या आधी काय करु नये? किंवा काय केल्याने लग्न होत नाही, याबद्दल सांगितले आहे.
यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे की, “काही मुलंमुली मला लग्न करायचं नाही. मी लग्न करणार नाही असं वारंवार म्हणतात. घरातल्या काही कारणांमुळे किंवा घरातील काही व्यक्तींना व्यसन वगैरे असेल किंवा घरात काही भांडण किंवा कटकटी होत असतील, तर ते लोक कंटाळून किंवा चिडून मला लग्न नाही करायचं असं वारंवार म्हणतात. त्यामुळे त्यांच्या मनात लग्नाविषयी द्वेष किंवा राग निर्माण होतो. याच गोष्टी तुमच्या घरातही होत असतील तर त्या आपल्या तोंडाने म्हणू नका. कारण त्या गोष्टी हळूहळू खऱ्या व्हायला लागतात किंवा लग्न झाल्यानंतर लग्नामध्ये अडचणी येतात. लग्न झाल्यानंतर कुटुंबामध्ये काही समस्या येतात. पती-पत्नींमध्ये खूप समस्या निर्माण होतात.
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “बरेचजण आपल्या करिअरला प्रमाणापेक्षा अधिक महत्त्व देतात. त्यामुळे नातेसंबंध चांगले राहत नाहीत आई-वडिलांबरोबरचे संबंधदेखील खराब होतात. करिअर, प्रॉपर्टी, घर यामध्ये व्यस्त झाल्याने लग्नाचे वय निघून जाते. करिअर हे आयुष्यात कधीही करता येऊ शकते. पण लग्नाचे वय निघून गेले की, ते परत येत नाही. निसर्ग हा कुणासाठीही थांबत नाही. तुमचे वयही तुमच्यासाठी थांबणार नाही”.