‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. याचनिमित्ताने आज ठाण्यातील आनंदाश्रम या ठिकाणी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. या सोहळ्याला दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेता प्रसाद ओक व निर्माता मंगेश देसाई यांसह चित्रपटातील इतर कलाकारदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा मुहूर्त सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाषणात ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या पहिल्या भागाविषयी काही मुद्दे उपस्थित केले. यावेळी या चित्रपटाचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी काहींची नावे न घेता त्यांच्यावर टीका केली. (CM Eknath Shinde Statement On Dharmaveer 2 Movie)
यावेळी ते असं म्हणाले की, “काही लोकांना हा चित्रपट खटकला. यातील काही सीन्स त्यांना आवडले नाहीत. त्यांच्या मनासारख्या काही गोष्टी त्यांना चित्रपटात दिसल्या नाहीत. त्यामुळे काही लोक चित्रपट सुरू असतानाच मधून उठून गेले. पण आता कोणाला आवडो किंवा न आवडो हा चित्रपट आता पाहिजे तसाच बनवला जाईल. आता सगळे अधिकार आपल्या हातात आहेत. पहिल्या चित्रपटावेळी थोडी घुसमट झाली होती. इच्छेविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागल्या. प्रविणलाही तेव्हा काही गोष्टी आवडल्या नव्हत्या. पण त्यांना गोड बोलून प्रेमाने सांगावं लागलं. काही लोकांना हा चित्रपट पचला नाही. पण त्यावर एक वर्षांपूर्वीच गोळी दिली आहे.” असंही मिश्किलपणे म्हटले.
धर्मवीर -2 चित्रपटाच्या मुहूर्त कार्यक्रमातून लाईव्ह
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 27, 2023
27-11-2023 ????ठाणे https://t.co/dsfRd1qS6Z
याबरोबरच या चित्रपटाच्या हिंदी रिमेकबद्दलही त्यांनी भाष्य केले. यावेळी ते असं म्हणाले की, “धर्मवीर हा चित्रपट गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश यांसारख्या भागांतदेखील बघितला गेला. हा चित्रपट हिंदीत बनवावा असंही काहीनी सांगितलं. त्यामुळे भाग २ हिंदीतही आला पाहिजे.” असं त्यांनी म्हटलं. यापुढे त्यांनी चित्रपटाच्या पहिल्या भागाचे कौतुक करताना ते असं म्हणाले की, “भाग १ चांगला झाला. धर्मवीरच्या पहिल्या भागाला १७ ते १८ पारितोषिके मिळाली. याव्यतिरिक्त प्रसाद ओकला अभिनयाची वेगळी पारितोषिके मिळाली. या चित्रपटासाठी सगळ्यांनी मेहनत घेतली, त्यासाठी सगळ्यांचे आभार.”
दरम्यान, धर्मवीरच्या शेवटच्या सीनमध्ये आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांची जवळची माणसं, कार्यकर्ते यांच्या अश्रुंचा बांध फुटल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे धर्मवीरच्या पहिल्या भागात आनंद दिघेंचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले होते. मग आता या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला मिळणार? याकडं सर्वांचेच लक्ष लागलं आहे.